‘कट आॅफ’ची धाकधूक
By Admin | Updated: June 22, 2015 03:13 IST2015-06-22T03:13:34+5:302015-06-22T03:13:34+5:30
अकरावी आॅनलाइन प्रवेशाची पहिली कट आॅफ लिस्ट सोमवारी जाहीर होणार आहे. यंदा लागलेल्या ऐतिहासिक निकालामुळे नामांकित महाविद्यालयांची पहिलीच

‘कट आॅफ’ची धाकधूक
मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेशाची पहिली कट आॅफ लिस्ट सोमवारी जाहीर होणार आहे. यंदा लागलेल्या ऐतिहासिक निकालामुळे नामांकित महाविद्यालयांची पहिलीच कट आॅफ ९५ टक्क्यांवर लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ९० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्याही मनातही प्रवेशाबाबत धाकधूक आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी एकूण २ लाख ६४९ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रवेश अर्ज केले आहेत. त्यांच्यासाठी
१ लाख ६२ हजार ८४१ जागा उपलब्ध होत्या. त्यात व्यवस्थापन, इनहाउस आणि अल्पसंख्याक कोट्यातील नव्या ५४ हजार ७६१ जागांची भर पडली आहे. त्यामुळे कमी टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या मनात नवीन आशा पल्लवीत झाल्या आहेत.
या आधी व्यवस्थापन, इनहाउस आणि अल्पसंख्याक कोट्यासाठी १ लाख २६ हजार ९१ जागांसाठी संस्था स्तरावर प्रवेश होणार होते. मात्र त्यातील केवळ ७१ हजार ३३० जागा भरल्या गेल्याने उर्वरित ५४ हजार ७६१ रिक्त जागा रिक्त राहिल्या, ज्या संबंधित संस्थांनी आॅनलाइन प्रवेशासाठी समर्पित केल्या आहेत. त्यामुळे आॅनलाइन प्रवेश पद्धतीने भरल्या जाणाऱ्या जागांची संख्या २ लाख १७ हजार ६०२ इतकी झाली आहे. परिणामी, प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळाल्यावर काही जागा रिक्त राहण्याची भीती महाविद्यालयांना आहे.