पहिल्या यादीची धाकधूक
By Admin | Updated: June 30, 2015 03:19 IST2015-06-30T03:19:46+5:302015-06-30T03:19:46+5:30
राज्यातील शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) १ लाख २३ हजार १०४ जागांसाठी शनिवारी आॅनलाइन अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण

पहिल्या यादीची धाकधूक
मुंबई : राज्यातील शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) १ लाख २३ हजार १०४ जागांसाठी शनिवारी आॅनलाइन अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण २ लाख ५९ हजार ९५६ अर्जांची नोंद करण्यात आली आहे. प्रवेश क्षमतेच्या दुप्पट अर्ज आल्याने ४ जुलै रोजी जाहीर होणाऱ्या पहिल्या कट आॅफ लिस्टबाबत विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.
शासकीय आयटीआयसोबत प्रथमच खाजगी आयटीआयच्या एकूण ७८ प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी (ट्रेड) केंद्रीय आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. रविवारी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर झाली. त्यानंतर सोमवारी, २९ जूनपासून २ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीसाठी संस्थानिहाय विकल्प आणि प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. त्यानंतर ४ जुलैला पहिली कट आॅफ जाहीर होईल. शासकीय आयटीआयमधील ९२ हजार ४३३ आणि खाजगी आयटीआयमधील ३० हजार ६७१ जागांसाठी एकूण चार फेऱ्या घेण्यात येतील. तर पाचवी फेरी समुपदेशनसाठी असेल. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांना कमाल १०० विकल्प निवडण्याची मुभा दिली आहे. त्यात पहिल्या फेरीत पहिला, दुसऱ्या फेरीत पहिले तीन आणि तिसऱ्या फेरीत पहिल्या सात पर्यायांपैकी ज्या कॉलेजमध्ये मिळेल, तिथे प्रवेश घेणे अनिवार्य आहे. (प्रतिनिधी)
फिटर आणि वेल्डरला अधिक मागणी
गेल्या वर्षी एकूण ७८ ट्रेडमधील वेल्डर आणि फिटरला अधिक मागणी असल्याचे निदर्शनास आले होते. फिटरच्या १५ हजार ३३० जागांसाठी आलेल्या अर्जांमध्ये ९१.६३ टक्क्यांवर कट आॅफ लागली होती. तर १४ हजार ९१० जागा असलेल्या वेल्डर ट्रेडसाठी कट आॅफचा टक्का ९० टक्क्यांपर्यंत गेला होता.