संवेदनशील मनाच्या कल्पकतेचा साक्षात्कार

By Admin | Updated: November 28, 2015 01:44 IST2015-11-28T01:44:33+5:302015-11-28T01:44:33+5:30

कलाकारांच्या संवेदनशील अंत:करणातील जग जेव्हा कोऱ्या कॅन्व्हासवर उतरते, तेव्हा ते चित्र पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून जाते

Interview of the creative mind of sensitive mind | संवेदनशील मनाच्या कल्पकतेचा साक्षात्कार

संवेदनशील मनाच्या कल्पकतेचा साक्षात्कार

औरंगाबाद : कलाकारांच्या संवेदनशील अंत:करणातील जग जेव्हा कोऱ्या कॅन्व्हासवर उतरते, तेव्हा ते चित्र पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून जाते. कोणत्याही महान चित्रकाराचे अनुकरण न करीत, स्वयंभू कल्पनेतून गवसलेल्या शैलीने साकारलेली कलाकृती ही अधिक आशयघन, शाश्वत असल्याचे जाणवू लागते. अशा संवेदनशील कलाकारांच्या मनाच्या कल्पकतेचा साक्षात्कार ‘श्लोक’ या चित्रप्रदर्शनातून पाहावयास मिळत आहे.
शुक्रवारची सायंकाळ मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातील तरुण व नवोदित चित्र व शिल्पकारांसाठी विशेष ठरली. त्यांच्या चित्र व कलाकृतींचा समावेश असलेल्या ‘श्लोक-२०१५’ प्रदर्शनाला सुरुवात झाली. लोकमत भवन येथील लोकमत हॉलमध्ये आयोजित प्रदर्शनाच्या प्रारंभी स्वातंत्र्यसेनानी व लोकमतचे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, कार्यकारी संचालक करण दर्डा, सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा आशू दर्डा, श्लोकच्या संचालिका शीतल दर्डा व यलो डोअरच्या चीफ लर्निंग आॅफिसर रुचिरा दर्डा यांनी तांब्याच्या घंगाळामध्ये पाण्यात प्रज्वलित पणती ठेवून ‘श्लोक’चे अनोख्या पद्धतीने उद्घाटन केले. परीक्षक, लेखक, चित्रकार संजीव सोनपिंपरे, चित्रकार शुभलक्ष्मी शुक्ला, चित्रकार यशवंत देशमुख, हेमंता राऊल, संजय निकम यांनीही प्रज्वलित पणत्या पाण्यात ठेवल्या.
प्रदर्शनात प्रवेशद्वारातच ईजल, ब्रश, पॅलेटने डेकोरेशन केलेली कलाकृती सर्वांना पाहावयास मिळते. कल्पक कलाविष्काराला येथूनच सुरुवात होते. वॉटर कलरमधून साकारलेले ‘प्रार्थनेचे प्रवेशद्वार’ सर्वांना भावून जाते. जुने अडगळीत पडलेले ट्रॅक्टर दाखविताना त्याच्या चाकांना वेल चढलेले चित्रही कल्पकतेची दाद घेऊन जाते. अजिंठा गावाचे दृश्य, गौतम बुद्धांचा जीवन प्रवासही अंतर्मुख करतो. सायकल कॅरिअरवर भल्या मोठ्या टोपलीत मोठमोठ्या आकाराचे टरबूज ठेवलेले चित्र, सुगरणीचे घरटे, दोन आदिवासी महिलांची मैत्री, हवेतील घर, शहरातील पावसाळा, ग्रामीण भागातील पारंपरिक वेशभूषा केलेली महिला, अजिंठ्याचे शिल्प, गाय-वासराची माया, सुभेदारी विश्रामगृहासमोरील रंगीन दरवाजा अशा चित्रकृतींसोबत ब्लॅक न्यूज व सेल्फी काढणारी आधुनिक तरुणी, असे अंत:करणातून निर्माण झालेले दृश्य कुंचल्यातून प्रकट झाल्याचे येथे दिसून येते. लाल, काळ्या, हिरव्या रंगांची जादू वातावरण भारावून टाकत होती. प्रत्येक चित्र आपल्याशीच बोलतेय, असे वाटते. तीनदिवसीय प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे, असे आयोजकांनी सांगितले.

Web Title: Interview of the creative mind of sensitive mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.