आंतरजिल्हा बदलीवरील निर्बंध हटले!
By Admin | Updated: May 2, 2017 00:29 IST2017-05-02T00:29:12+5:302017-05-02T00:29:12+5:30
वाशिम : गत कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्राथमिक शिक्षकांचा आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न आता निकाली निघाला आहे.

आंतरजिल्हा बदलीवरील निर्बंध हटले!
राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांना दिलासा : वेळापत्रक जाहीर
वाशिम : गत कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्राथमिक शिक्षकांचा आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न आता निकाली निघाला आहे. विभागनिहाय आॅनलाइन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक शासनाने जाहीर केले असून, आॅनलाइन अर्ज केलेल्या पात्र शिक्षकांची उपलब्ध जागेनुसार आंतरजिल्हा बदली केली जाणार आहे.
गत काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया बंद असल्याने शिक्षकांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. आंतरजिल्हा बदली प्रकरण निकाली काढण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांकडून वारंवार झाली. शासनस्तरावर या मागणीचा सकारात्मक विचार झाल्याने आंतरजिल्हा बदली प्रकरणी शासनाने २४ एप्रिल २०१७ अन्वये सुधारीत धोरण निश्चित केले. त्यानुसार इच्छूक शिक्षकांना संबंधित पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहेत. विभागनिहाय अर्ज सादर करण्याचे वेळापत्रकही शासनाने जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार २८ ते ३० एप्रिल दरम्यान पुणे, कोल्हापूर व मुंबई विभागातील इच्छूक शिक्षकांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेण्यात आले. २ ते ४ मे दरम्यान नाशिक, औरंगाबाद व लातूर विभागातील इच्छूक शिक्षकांकडून आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले तर अमरावती व नागपूर विभागातील इच्छूक शिक्षकांना ५ ते ७ मे या दरम्यान आॅनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. तत्पूर्वी गटशिक्षणाधिकाऱ्यांना इच्छूक शिक्षकांच्या सरल प्रणालीवरील नोंदी अद्ययावत कराव्या लागणार आहेत. या नोंदी अद्ययावत करण्याची कार्यवाही अमरावती विभागात सुरू आहे.
आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छूक असलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना विहित मुदतीत त्या-त्या पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. शासनाच्या वेळापत्रकानुसार अमरावती विभागातील इच्छूक शिक्षकांना ५ ते ७ मे या दरम्यान आॅनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत.
- दिनकर जुमनाके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, वाशिम.