माणगावात मे मध्ये आंतरराज्य कॅरम स्पर्धा
By Admin | Updated: March 19, 2015 21:01 IST2015-03-19T21:01:36+5:302015-03-19T21:01:36+5:30
कॅरम या खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा, यात दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत, हा उद्देश ठेवून ही स्पर्धा आयोजित

माणगावात मे मध्ये आंतरराज्य कॅरम स्पर्धा
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशन व मळावाडी मित्रमंडळ माणगाव यांच्या विद्यमाने संदेश पारकर पुरस्कृत आंतरराज्य कॅरम स्पर्धा १ ते ३ मे या कालावधीत माणगाव-मळावाडी येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुधीर भणगे यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली. पत्रकार परिषदेत बोलताना सुधीर भणगे म्हणाले, या स्पर्धेसाठी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, कर्नाटक, गोवा येथील नामांकित खेळाडू उपस्थित राहणार आहेत.
एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारात ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रेक्षकांना दर्जेदार व कलात्मक
कॅरम खेळाची मेजवानी मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनने सावंतवाडी, मळगाव, माणगाव, कुडाळ, कणकवली, देवगड, वेंगुर्ले आदी विविध ठिकाणी सुमारे आठ ते दहा जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन केले आहे. यामध्ये १०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि छत्रपती पुरस्कार विजेते अरुण केदार, सुहास कांबळी तसेच आंतरराष्ट्रीय पंच आशिष बागकर उपस्थित राहणार असून, या स्पर्धेलाआंतरराष्ट्रीय दर्जाचे कॅरमबोर्ड व सोंगट्या वापरण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी योगेश फणसळकर, शुक्राचार्य म्हाडेश्वर, अमोल खानोलकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेवेळी संदेश पारकर, सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे सरचिटणीस अमोल खानोलकर, चिटणीस योगेश फणसळकर, रुपेश पावसकर, शुक्राचार्य म्हाडेश्वर, राकेश कांदे, शोएब खुल्ली, सचिन घाडी,
सुनील धुरी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कॅरम या खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा, यात दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत, हा उद्देश ठेवून ही स्पर्धा आयोजित केली आहे. महाराष्ट्र तसेच गोवा, कर्नाटकातील सुमारे २०० ते २५० स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
- संदेश पारकर