आंतरराष्ट्रीय तस्कर सोरामला पंजाबमधून अटक
By Admin | Updated: August 29, 2014 00:57 IST2014-08-29T00:57:12+5:302014-08-29T00:57:12+5:30
देशभरातून शिकार झालेल्या वाघांच्या अवयवांची नेपाळला नेऊन विक्री करणारा आंतरराष्ट्रीय तस्कर सोराम (शिवराम) बावरिया याला गुरूवारी पहाटे ३.३० वाजता पंजाबमधील होशियारपूर येथून अटक करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय तस्कर सोरामला पंजाबमधून अटक
मेळघाट सेलची रेकी : दिल्लीतून नेपाळला नेत होता वाघांचे अवयव
नरेंद्र जावरे - अमरावती
देशभरातून शिकार झालेल्या वाघांच्या अवयवांची नेपाळला नेऊन विक्री करणारा आंतरराष्ट्रीय तस्कर सोराम (शिवराम) बावरिया याला गुरूवारी पहाटे ३.३० वाजता पंजाबमधील होशियारपूर येथून अटक करण्यात आली. तो एक वर्षापासून फरार होता. मेळघाट वाईल्ड लाईफ क्राईम सेलच्या माहितीवरून वाईल्ड लाईफ क्राईम कंल्ट्रोल बोर्ड दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
सोराम ऊर्फ शिवराम बावरिया (४८, रा. सोनीपत, हरियाणा) हा देशभरातील वाघांची शिकार करून कातडे व अवयवांची नेपाळला जाऊन विक्री करायचा. गुरुवारी पंजाबच्या होशियारपूर येथून पहाटे ३.३० वाजता त्याला मित्राच्या घरातून अटक करण्यात आली. त्याने देशभरातील किती वाघांचे कातडे व अवयवांची नेपाळला तस्करी केली याचा लवकरच खुलासा होणार आहे.
सरजूचा भाऊ सोराम
नागपूर, अकोट, ढाकणा (मेळघाट) व्याघ्र प्रकल्पात वाघांची शिकार प्रकरणात गुंतलेला सरजू बावरिया याला गतवर्षी सप्टेंबर महिन्यात दिल्ली येथे अटक करण्यात आली. मेळघाट वाईल्ड लाईफ क्राईम सायबर सेलचे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, सहायक वनसंरक्षक विशाल माळी, परीक्षित डंबारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली होती. सरजू व त्याचा सहकारी नरेश एच. आर. ११-१००१ या क्रमांकाच्या कारमधून वाघाची हाडे व रोख अडीच लक्ष रूपये आणताना जाळ्यात अडकला होता.
त्याच सरजू बावरिया या तस्कराचा सोराम ऊर्फ शिवराम बावरिया हा सख्खा भाऊ असल्याचे तपासात उघड झाले आहे.
दोघांचाही वाघ तस्करीचा व्यवसाय
सरजू बावरिया हा देशभरातील जंगलात वाघांची शिकार करण्यासाठी सहकाऱ्यांना प्रशिक्षण व आर्थिक मदत पोहचवित होता.
शिकार झाल्यावर कातडे व अवयव दिल्ली येथील फायनान्सर सूरज पाल ऊर्फ चाचा याला पुरविले जात होते. तर सोराम बावरिया हा दिल्ली येथून नेपाळ स्थित तस्करांना त्याचा पुरवठा करीत होता. गोरखपूरमार्गे नेपाळला तो स्वत: जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.