जळगावात अहिंसा व शांतीसाठी महिलांची आंतरराष्ट्रीय परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2016 20:08 IST2016-09-28T20:08:29+5:302016-09-28T20:08:29+5:30
देशांतर्गत सामाजिक अस्वस्थता तर सीमेवरच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देश भरडले जात आहेत.

जळगावात अहिंसा व शांतीसाठी महिलांची आंतरराष्ट्रीय परिषद
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 28 - संपूर्ण जग हे आज अस्वस्थतेच्या उंबरठ्यावर उभे असून यात देशांतर्गत सामाजिक अस्वस्थता तर सीमेवरच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देश भरडले जात आहेत. धर्म, जात, आर्थिक विषमता, पर्यावरण आदी सर्वच घटकात तिरस्कार आणि हिंसेच्या राजकारणाला सामान्य बळी पडत आहेत. युगानयुगापासून ही अस्वस्थता सहन करूनही स्वतःसह परिवाराला सावरून धरणाऱ्या नारीशक्तीने सहिष्णुता व अहिंसेला कधी दूर सारले नाही. आजच्या जगाला आवश्यक असलेल्या सहिष्णुता व अहिंसेच्या विचार व वर्तनाला भक्कम करण्याच्या उद्देशाने गांधी तीर्थ जैन हिल्स येथे 2 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशन, एकता फाउंडेशन ट्रस्ट भोपाळ आणि इंटरनॅशनल गांधी इन्स्टिट्युट ऑफ नॉनव्हायलन्स अण्ड पीस मदुराई यांच्या संयुक्तविद्यमाने होणाऱ्या या परिषदेत 35 देशांतील सुमारे 200 महिला प्रतिनिधी सहभागी होत आहेत.
2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता जैन हिल्स येथील आकाश ग्राऊंडवर या परिषदेचे उद्घाटन श्रीमती कृष्णमल जगन्नाथन यांच्याहस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून गांधी रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या जिल कार-हॅरिस, विश्वस्त दलिचंद जैन, जिल्हाधिकारी सौ. रुबल अग्रवाल, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आदी मान्यवर उपस्थित राहतील.