आंतर महिला मंडळ भव्य पाककला स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 01:56 IST2016-07-31T01:56:34+5:302016-07-31T01:56:34+5:30
श्रावण हा सणांचा महिना आणि सण म्हटले की, जिभेचे चोचले पुरविणारे व आनंदाचा आस्वाद देणारे पदार्थ आपल्याला चाखायचे असतात.
_ns.jpg)
आंतर महिला मंडळ भव्य पाककला स्पर्धा
मुंबई : श्रावण हा सणांचा महिना आणि सण म्हटले की, जिभेचे चोचले पुरविणारे व आनंदाचा आस्वाद देणारे पदार्थ आपल्याला चाखायचे असतात. म्हणून श्रावण महिन्याची गोडी वाढविण्यासाठी मिती क्रिएशन्सतर्फे श्रावण महोत्सवात ‘आंतर महिला मंडळ पाककला स्पर्धा २०१६’चे आयोजन करण्यात आले आहे. या श्रावण महोत्सव २०१६ला ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे.
मुंबईमधील १३ महिला मंडळांचा या स्पर्धेत समावेश असेल. प्रत्येक महिला मंडळामध्ये प्राथमिक फेरी घेतली जाईल आणि प्रत्येक महिला मंडळातून पाच जणींची निवड करून त्यांचा
समूह बनविला जाईल. हा समूह अंतिम फेरीमध्ये त्यांच्या मंडळाचे प्रतिनिधित्व करेल. अंतिम फेरीचे मुख्य परीक्षक हॉटेल उद्योजक विठ्ठल कामत असतील. या पाककला स्पर्धेची संकल्पना व संयोजन मिती क्रिएशन्सच्या उत्तरा मोने यांचे आहे.
या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एक श्रावणातील पारंपरिक पदार्थ आणि बटाट्याशिवाय अन्य सारण घालून वडा करणे; तर अंतिम फेरीत इंडियन राईस रेसिपी (भारतीय भाताचा कुठलाही एक प्रकार) आणि मधाचा वापर करून तयार केलेला गोड पदार्थ अथवा पेय करण्याचे आव्हान स्पर्धकांना असेल. एकूणच पदार्थांच्या चवीवर आणि सादरीकरणावर स्पर्धेचा निर्णय अवलंबून असेल. अंतिम फेरीत तीन महिला मंडळांची प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थानासाठी निवड केली जाईल. पाच महिलांचा मिळून एक समूह म्हणजेच १५ महिलांची विजेत्या म्हणून निवड केली जाणार आहे. त्या सर्व महिलांना एस्सेल वर्ल्डतर्फे प्रत्येकी ४ मोफत पासेस आणि ‘आॅर्किड’ हॉटेलच्या विठ्ठल कामत यांच्या सोबत स्पेशल ब्रेकफास्ट मेजवानीची संधी मिळणार आहे. तसेच बक्षिसे म्हणून पितांबरी, तन्वी हर्बल्स, फोंडाघाट फार्मसी, वंडरशेफ यांची गिफ्ट हॅम्पर्स असतील. त्याचप्रमाणे सहभागी झालेल्या प्रत्येक महिला मंडळाला एस्सेल वर्ल्डची सहल ५० टक्के सवलतीत करता येईल.