क्रिकेट बेटिंगचे जाळे आंतरराज्य : देशमुख
By Admin | Updated: February 13, 2015 01:14 IST2015-02-13T01:08:32+5:302015-02-13T01:14:58+5:30
पथके रवाना : टाकाळ्यातील बेटिंग कारवाईची व्याप्ती वाढली; उद्या अटक होणार

क्रिकेट बेटिंगचे जाळे आंतरराज्य : देशमुख
कोल्हापूर : राजारामपुरी-टाकाळा परिसरातील फ्लॅटवर राजारामपुरी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यातील क्रिकेट बेटिंग प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे. भोपाळ, सोलापूर, लातूर, पिंपरी, नागपूर या ठिकाणी तसेच कोल्हापुरातील सहा ठिकाणी बेटिंग झाल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. यावरून क्रिकेट बेटिंगचे हे जाळे आंतरराज्यीय असल्याचे स्पष्ट होत आहे. क्रिकेट बेटिंग प्रकरणात सहभागी असणाऱ्यांना उद्या, शनिवारी अटक होणार असल्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी सांगितले.
२२ जानेवारीला राजारामपुरी टाकाळा परिसरात एका फ्लॅटवर आॅस्ट्रेलिया व इंग्लंड या क्रिकेट सामन्याचे बेटिंग घेत असताना संशयित प्रकाश श्रीचंद जग्याशी (वय ४०), लक्ष्मण सफरमल कटयार (२७, दोघे राहणार प्रेमप्रकाश मंदिरजवळ, गांधीनगर, ता. करवीर) यांना अटक केली होती व त्यांच्याकडून सुमारे ४० मोबाईल, लॅपटॉप, एलईडी, मोबाईल, प्रिंटर, वॉकमन, मोटारसायकल असा सुमारे १ लाख ४७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. यावेळी संशयित व फ्लॅटमालक महापालिकेचे विरोधी पक्षनेते संशयित मुरलीधर पांडुरंग जाधव हा पसार झाला होता. चार दिवसांपूर्वी संशयित जाधवला पोलिसांनी अटक केली. उद्यापासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तसेच या प्रकरणाचा छडा याचे आव्हान पोलिसांना आहे. त्यानुसार टाकाळा येथे टाकलेल्या छाप्यात सापडलेले ४० मोबाईल, त्या मोबाईलमध्ये असलेल्या नंबरवरून तपास केला आणि गुप्त बातमीदारानुसार क्रिकेट बेटिंग प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना सापडले. प्राथमिक तपासामध्ये भोपाळ (मध्यप्रदेश), सोलापूर, नागपूर, पिंपरी, लातूर तसेच कोल्हापुरातील सहा बेटिंगवाल्यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले.
क्रिकेट बेटिंग प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, त्याची पाळेमुळे खोदून काढणार आहे. या प्रकरणाच्या शेवटच्या मुळापर्यंत जाणार आहोत.
- अमृत देशमुख, पोलीस निरीक्षक राजारामपुरी पोलीस ठाणे, कोल्हापूर.