आंतरजातीय प्रेमविवाह; दाम्पत्याची आत्महत्या
By Admin | Updated: May 29, 2016 00:35 IST2016-05-29T00:35:03+5:302016-05-29T00:35:03+5:30
आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तारळे विभागातील बांधवट (ता. पाटण) येथे शनिवारी सकाळी ही घटना घडली.
आंतरजातीय प्रेमविवाह; दाम्पत्याची आत्महत्या
तारळे (जि.सातारा) : आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तारळे विभागातील बांधवट (ता. पाटण) येथे शनिवारी सकाळी ही घटना घडली. दरम्यान, आत्महत्या केलेली विवाहिता सात महिन्यांची गर्भवती होती, अशी माहिती समोर आली आहे. दोघांच्या आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.
राजू रामचंद्र सूर्यवंशी (वय २६) व अर्चना (१९) असे दाम्पत्याचे नाव आहे. बांधवट येथील राजू सूर्यवंशी याने वर्षभरापूर्वी मरळोशी (ता. पाटण) येथील अर्चना हिच्याशी आंतरजातीय विवाह केला होता. विवाहानंतर हे दाम्पत्य काही महिने कोल्हापूर येथे वास्तव्यास होते. राजू हा कारवर चालक म्हणून काम करीत होता, तर अर्चना घरीच राहत होती. दोन महिन्यांपूर्वी दोघेही गावी बांधवट येथे आले व घरी राहू लागले. शनिवारी सकाळी घराचा दरवाजा बंदच होता. काही वेळानंतर कुटुंबियातील सदस्यांनी हाका मारल्या; मात्र आतून कसलाच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता, दोघांनी माळ्याच्या कळकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. यामागचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)