औषधे खरेदीसाठी एकात्मिक महामंडळ

By Admin | Updated: March 20, 2015 00:08 IST2015-03-20T00:08:44+5:302015-03-20T00:08:44+5:30

वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत सुसूत्रता आणण्यासाठी एकात्मिक महामंडळ स्थापन करण्याचा सरकारचा विचार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधान परिषदेमध्ये स्पष्ट केले.

Integrated corporation for the purchase of medicines | औषधे खरेदीसाठी एकात्मिक महामंडळ

औषधे खरेदीसाठी एकात्मिक महामंडळ

मुंबई : सरकारी रुग्णालयात होणारी औषधे तसेच वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत सुसूत्रता आणण्यासाठी एकात्मिक महामंडळ स्थापन करण्याचा सरकारचा विचार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधान परिषदेमध्ये स्पष्ट केले.
नागपूर येथील अतिविशेषोपचार रुग्णालयातील डायलिसीस मशीन नादुरुस्त होण्याबाबतचा तारांकित प्रश्न प्रा. जोगेंद्र कवाडे, हेमंत टकले, किरण पावसकर आदी सदस्यांनी उपस्थित केला होता. त्यावर तावडे म्हणाले की, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, ईएसआयसी, वैद्यकीय औषध आणि शिक्षण संचालनालय यांच्यामार्फत चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयातील औषध व वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठीची प्रकिया अतिशय क्लिष्ट आहे. त्यामुळे या प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे रुग्णालातील रुग्णांना वेळेवर लाभ मिळत नसल्याच्या अडचणी पुढे येत आहेत. त्यामुळे ही खरेदीप्रकिया सुकर करण्याच्या दृष्टीने एक नव्याने एकात्मिक महामंडळ स्थापन करून महामंडळाकडे खरेदीची एकात्मिक नोंदणी झाल्यास ही खरेदी सुरळीत होईल, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला. या महामंडळामध्ये सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश असेल, असे ते म्हणाले.

एकही शाळा बंद होणार नाही
बीड जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या इमारतींच्या थकीत भाड्याच्या रकमेचा विषय हा तांत्रिक असून, तो लवकरच सोडविण्यात येईल आणि कुठलीही शाळा बंद होणार नाही अथवा राज्यातील एकाही शाळेवर अन्याय होणार नाही याची काळजी सरकार घेईल, असेही तावडे यांनी आणखी एका तारांकित प्रश्नाच्या
उत्तरात सांगितले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित आदी सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.

जबाबदारी निश्चितीसाठी नियमावली
पुण्यातील वानवाडी येथील सिटी इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा झालेला प्रकार अतिशय घृणास्पद आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे त्यांनी अन्य एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. पुण्यामध्येच नव्हेतर राज्यातही स्कूलबसमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतात, परंतु अशा घटनांमध्ये शाळा व्यवस्थापन जबाबदार आहे, बसचालक जबाबदार आहे की, मुख्याध्यापक हे निश्चित करण्याची आवश्यकता आहे. यादृष्टीने नवीन नियमावली तयार करण्याचा विचार केला पाहिजे, असे तावडे म्हणाले.
स्कूलबसमध्ये महिला कर्मचारी
शाळा ते घर किंवा घर ते शाळा हा विद्यार्थ्याचा स्कूलबसमधील प्रवास अधिक सुरक्षितपणे होण्यासाठी तसेच विद्यार्थ्याच्या स्कूलबसच्या प्रवासाचा मागोवा घेण्यासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर कंपन्या पुढे आल्या आहेत. त्याचा कितपत उपयोग करता येईल याचाही विचार करण्यात येईल. ज्या स्कूलबसमध्ये महिला कर्मचारी उपस्थित नाहीत, अशा शाळांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. जयदेव गायकवाड, हेमंत टकले आदी सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.
कला-क्रीडासाठी शिक्षक
कला, क्रीडा व संगीत हे विषय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असून, या तीनही विषयांचे शिक्षक शाळांमध्ये उपलब्ध होण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने सेंट्रल पूल तयार करण्याची योजना प्रस्तावित आहे. या प्रस्तावित सेंट्रल पूलमधून तीनही विषयांचे शिक्षक उपलब्ध होतील याची दक्षता आमचा विभाग घेईल, असे आश्वासन त्यांनी कपिल पाटील यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिले.

 

Web Title: Integrated corporation for the purchase of medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.