विमा रुग्णालयाचा डोलारा २६ परिचारिकांवर
By Admin | Updated: December 21, 2014 00:17 IST2014-12-21T00:17:17+5:302014-12-21T00:17:17+5:30
सोमवारी पेठ येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी ५५ परिचारिकांची गरज असताना बंधपत्रित परिचारिकांसह केवळ २६ परिचारिकांच्या खाद्यांवर रुग्णसेवा आहे.

विमा रुग्णालयाचा डोलारा २६ परिचारिकांवर
सोयींअभावी रुग्णसेवा प्रभावित : विविध संवर्गातील ६० टक्के पदे रिक्त
नागपूर : सोमवारी पेठ येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी ५५ परिचारिकांची गरज असताना बंधपत्रित परिचारिकांसह केवळ २६ परिचारिकांच्या खाद्यांवर रुग्णसेवा आहे. परिणामी रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. या रुग्णालयात सध्या कायमस्वरूपी १४, तर बंधपत्रित १२ परिचारिका कार्यरत आहेत. या बंधपत्रित परिचारिकांचा करार जानेवारी २०१५ मध्ये संपत आहे. या १२ जागा कायमस्वरूपी न भरल्यास रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या या रुग्णालयात सोयींचा अभाव आहे. रुग्णालयातील डॉक्टर सोडल्यास विविध संवर्गातील ६० टक्के पदे रिक्त आहेत. यामुळे रुग्णालयातील सहा वॉर्डाचे चार वॉर्डात रूपांतर करण्यात आले. मुनष्यबळाची तोकडी संख्या व सोयींच्या अभावाने गुंतागुंतीच्या प्रसूतीच्या शस्त्रक्रियांपासून ते आकस्मिक गंभीर आजाराच्या रुग्णांना मेडिकलकडे पाठविण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक समस्यांशी तोंड देत असलेले हे रुग्णालय आता परिचारिकांच्या तोकड्या संख्याबळामुळे अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे, बंधपत्रित परिचारिकांना दोन वर्षाच्या मुदतीत काम करण्याचा नियम असताना या परिचारिकांना एकाच वर्षाची मुदत देण्यात आली आहे. त्यातही येत्या जानेवारी महिन्यात ही मुदत संपत असल्याने रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे.
डिजिटल एक्स-रे मशीनची प्रतीक्षा
रुग्णालयाच्या अस्थिरोग विभागात दिवसाकाठी ४० ते ५० रुग्णांचे ‘एक्स-रे’ काढले जातात. मात्र विमा रुग्णालयात सध्या हे एकमेव यंत्र आहे. पण, या यंत्राची मुदतही संपली आहे. मागील तीन वर्षांपासून नवीन एक्स-रे यंत्रासाठी आयुक्त, राज्य कामगार विमा महामंडळाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. महामंडळाने हा प्रस्ताव पारित करून तो मंजुरीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठवला होता. त्याला यापूर्वीच्या आघाडी शासनाने मंजुरी प्रदान केली होती. साधारण २४ लाखांची ही मशीन येणार आहे, असे सर्वच म्हणत असले तरी ती लागणार कधी यावर सर्वच मौन धारण करून आहेत. (प्रतिनिधी)
सीआर मशीनची गरज
विमा रुग्णालयात अस्थिरोग विभागात आता महत्त्वाच्या शस्त्रक्रिया होऊ लागल्या आहेत. यामुळे या विभागात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्याच्या स्थितीत रोज शंभरावर रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, हाडाच्या फ्रॅक्चरचे त्वरित निदान करणारे ‘सीआर’ मशीन उपलब्ध नसल्याने डॉक्टरांना तत्काळ निर्णय घेण्यास अडचण जाते.
पॅथालॉजी विभाग तीन वर्षांपासून बंद
रुग्णालयातील पॅथालॉजी विभागातील तंत्रज्ञ व सहायकाची सर्वच पदे रिक्त आहेत. यामुळे हा विभाग तीन वर्षांपासून बंद आहे. रुग्णाच्या विविध चाचण्याची जबाबदारी एका खासगी पॅथालॉजीला देण्यात आली आहे. रुग्णालयाला महिन्याकाठी दोन-तीन लाख रुपये मोजावे लागत आहे.
सहापैकी चार वॉर्डच सुरू
रुग्णालयात एकूण सहा वॉर्ड आहेत. त्यातील दोन वॉर्ड बंद पडले आहेत. प्रसुती, अस्थिरोग व मेडिसीन (औषध) एवढेच वॉर्ड सुरू आहेत. रुग्णालयात अत्याधुनिक टेबलाची अत्यंत आवश्यकता आहे. हा प्रस्तावही तीन वर्षांपूर्वीच पाठविण्यात आला. परंतु, त्याला अद्याप मान्यताच मिळाली नाही.