‘मेट्रो-३’च्या मार्गावरील इमारतींचा विमा
By Admin | Updated: March 14, 2015 05:03 IST2015-03-14T05:03:16+5:302015-03-14T05:03:16+5:30
ज्या मार्गावरून मेट्रो-३ जाईल त्या ठिकाणच्या इमारतींना कोणताही धोका होणार नाही. परंतु त्या मार्गावरील इमारतींना किती हादरे बसतात याचे

‘मेट्रो-३’च्या मार्गावरील इमारतींचा विमा
मुंबई : ज्या मार्गावरून मेट्रो-३ जाईल त्या ठिकाणच्या इमारतींना कोणताही धोका होणार नाही. परंतु त्या मार्गावरील इमारतींना किती हादरे बसतात याचे मूल्यमापन करण्यासाठीची कायमस्वरूपी यंत्रणा उभी केली जाईल. शिवाय, त्याचे नियमित मॉनिटरिंग केले जाईल आणि गरज पडल्यास विमा काढून दिला जाईल, अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेत केली.
या विषयावर विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्षवेधी दिली होती. त्यावर डॉ. पाटील म्हणाले, मेट्रो-३साठी ११.८० हेक्टर जागा कायमस्वरूपी लागणार आहे. त्यात जाणाऱ्या १६१३ झोपड्यांचे एमयूटीपीच्या धोरणानुसार पुनर्वसन केले जाणार आहे. यासाठी आजपर्यंत सहा प्रकारचे सर्व्हे झाले आहेत. विविध पक्षांची कार्यालयेदेखील हटवावी लागतील. सरकारने एमटीएनएल, वर्ल्ड ट्रेड सेंटर, फायर प्रेस हाउस या ठिकाणच्या जागा काही वर्षांसाठी घेण्याचे ठरवले असून, त्याकरिता ११७ कोटींची तरतूद केल्याची माहितीही राज्यमंत्र्यांनी या वेळी दिली. जमिनीपासून २० ते २५ मीटर खालून मेट्रो ३ जाणार आहे. ३२ किलोमीटर मार्गावरून ती जाणार आहे. त्यात आपल्याकडे भूभागात बसाल्ट खडक आहे. अन्य राज्यांत मऊ जमीन असणाऱ्या ठिकाणीदेखील मेट्रो यशस्वी झाली आहे. भूभागातून मेट्रो जाण्यामुळे काही इमारतींचा पुनर्विकास करताना अडचणी निर्माण होतील असे म्हणणे चुकीचे आहे. उलट मेट्रोच्या बेल्टमध्ये येणाऱ्या इमारतींनी त्यांचे पुनर्वसनाचे काम याच कामात करून घ्यावे, असेही डॉ. पाटील या वेळी म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)