मुंबई - राजकारणात होर्डिंग्स, बॅनर लावण्यासाठी कार्यकर्त्यांची चढाओढ असते. नेते त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरूनही शुभेच्छा बॅनर पोस्ट करत असतात. त्यातच शिंदेसेनेच्या काही नेत्यांचे शुभेच्छा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यात या पदाधिकाऱ्यांनी आनंद दिघेंऐवजी चक्क अभिनेता प्रसाद ओक यांचा फोटो लावत असल्याचं पुढे आले आहे.
अलीकडेच शिंदेसेनेकडून अमरावती जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत जिल्हाप्रमुखपदी ठाकूर प्रमोद सिंह गड्रेल यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे त्यांना शुभेच्छा देणाऱ्या काही बॅनरवर आनंद दिघे यांच्याऐवजी अभिनेता प्रसाद ओक यांचा फोटो लावण्यात आला आहे. खुद्द ठाकूर प्रमोद सिंह यांच्या बॅनरवरही गुढीपाडवा, स्वामी प्रकट दिनाच्या शुभेच्छा देताना अभिनेता प्रसाद ओक यांचा फोटो आनंद दिघे म्हणून छापण्यात आला आहे.
प्रसाद ओक यांनी साकारली होती दिघेंची भूमिका
धर्मवीर सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. ठाणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात आणि रुजवण्यात आनंद दिघे यांचा मोलाचा वाटा होता. आनंद दिघे यांच्या कार्यशैलीने ते लोकप्रिय झाले होते. याच दिघेंची भूमिका मोठ्या पडद्यावर आणण्याचं काम अभिनेता प्रसाद ओक यांनी केले. धर्मवीर आणि धर्मवीर २ या सिनेमासाठी अभिनेता प्रसाद ओक यांना आनंद दिघेंसारखा हुबेहुब लूक देण्यात आला होता. ओक यांची ही भूमिका चांगलीच गाजली. धर्मवीर सिनेमामुळे आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचली.
एकत्रित शिवसेनेच्या काळात आनंद दिघे हे केवळ ठाणे शहर आणि जिल्ह्यात लोकप्रिय होते. ठाणे, पालघर जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रत्येक बॅनरवर आनंद दिघे यांचा फोटो लावला जातो. परंतु एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी फारकत घेत शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. त्यानंतरच्या काळात राज्यभरात शिंदेसेनेकडून लावलेल्या प्रत्येक बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो दिसतो. त्यात अमरावतीत आनंद दिघेंऐवजी प्रसाद ओक यांचा फोटो दिसल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे.