कर्जाच्या हप्त्यापोटी तरुणाला कोंडले
By Admin | Updated: September 6, 2016 00:49 IST2016-09-06T00:49:46+5:302016-09-06T00:49:46+5:30
कर्जाचे हप्ते भरावेत म्हणून एका खासगी कंपनीमध्ये उच्चपदस्थ असलेल्या मुलाला कोंडून ठेवत धमकावण्यात आल्याची घटना उघडकीस आली

कर्जाच्या हप्त्यापोटी तरुणाला कोंडले
पुणे : वडिलांनी काढलेल्या कर्जाचे हप्ते भरावेत म्हणून एका खासगी कंपनीमध्ये उच्चपदस्थ असलेल्या मुलाला कोंडून ठेवत धमकावण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापक, वसुली अधिकाऱ्यासह तिघांविरुद्ध विमाननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कर्जदाराचे निधन झाल्यामुळे त्यांच्या मुलाकडे हप्त्यांसाठी तगादा लावण्यात येत होता.
सहयोगी उपाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, अमोल पांडे, वसुली अधिकारी अविनाश गवळी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी राहुल कमलाकर पाटील (वय ३०, रा. प्रसुन सवाय, धानोरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील बजाज फायनान्स कंपनीमध्ये उपव्यवस्थापक आहेत. ते पुण्यामध्ये एकटेच राहतात. त्यांच्या वडिलांचे १८ फेब्रुवारी २०१६ रोजी निधन झाले असून, त्यांनी मार्च २०१५ मध्ये कोटक महिंद्रा बॅँकेकडून ५ लाख २५ हजारांचे कर्ज घेतलेले होते. या कर्जाचे हप्ते भरण्यासंदर्भात बॅँकेने कमलाकर पाटील यांच्या नावाने पत्र पाठवले होते. त्यानंतर पाटील यांचा भाऊ आशिष आणि स्वत: पाटील यांनी बॅँकेत जाऊन वडिलांचे निधन झाल्याचे सांगितले. तरीही बॅँकेने त्यांच्याकडे हप्त्यांसाठी तगादा लावला. दोन वेळा निंबाळकर, पांडे यांच्या दबावाखातर पाटील यांनी १९ हजार ५०० रुपयांचे हप्ते भरले. त्यानंतर त्यांनी आपल्याला हप्ते भरणे शक्य नसून जी शक्य असेल ती कायदेशीर कारवाई करा, असे कळवले होते. मात्र, त्यांना मानसिक त्रास देण्यात येत होता. त्यांना पुणे स्टेशनजवळील सोहराब हॉल येथे नेऊन एका खोलीमध्ये डांबून ठेवण्यात आले. पुन्हा हप्ता घेण्यात आला.
आपल्याला भिती वाटत असल्याचे तसेच मानसिक त्रास झाल्याने उच्च रक्त दाबाचा त्रास सुरु झाल्याचे पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)