Mukhyamantri Ladki Bahin Yojana: राज्यातील महायुती सरकारने गेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेची प्रचंड चर्चाही झाली. विरोधक सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत. महायुतीने आश्वासन दिल्यानुसार लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये कधी मिळणार, अशी विचारणा सातत्याने विरोधकांकडून केली जात आहे. यातच लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यास उशीर होत आहे. अक्षय्य तृतीयेला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळू शकतो, असे सांगितले जात होते. परंतु, अद्यापही खात्यावर पैसै आलेले नाहीत.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला आहे. या दोन्ही विभागांचे अनुक्रमे ४१० कोटी ३० लाख आणि ३३५ कोटी ७० लाख रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे वळविण्यात आले आहेत. महिला आणि बालविकास विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केल्याचे समजते. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यास उशीर का होत आहे, याबाबत एक्सवर एक पोस्ट करत माहिती दिली.
लाडकी बहीण योजनेतील पैसे मिळण्यास उशीर का होतोय?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे, असे अदिती तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, राज्य सरकारने सन २०२५-२६ या वर्षीच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जाती उपयोजनेसाठी २२ हजार ६५८ कोटी तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी २१ हजार ४९५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यापैकी सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागासाठी सहायक अनुदान म्हणून ३ हजार ९६० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यातील ४१० कोटी ३० लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाला देण्यात आला आहे. आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या ३ हजार ४२० कोटी रुपयांच्या सहायक अनुदानातून ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आला. या दोन्ही खात्यातून प्रत्येक महिन्याला निधी वळता केला जाणार आहे.