व्यापा-यांना गंडविणारा भामटा अटकेत
By Admin | Updated: December 26, 2014 04:27 IST2014-12-26T04:27:09+5:302014-12-26T04:27:09+5:30
मोठ्या कंपनीचा मालक असल्याची बतावणी करून दादर परिसरातील व्यापाऱ्यांना करोडो रुपयांचा गंडा घालणारा भामटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

व्यापा-यांना गंडविणारा भामटा अटकेत
मुंबई : मोठ्या कंपनीचा मालक असल्याची बतावणी करून दादर परिसरातील व्यापाऱ्यांना करोडो रुपयांचा गंडा घालणारा भामटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. दिलीप पुरोहित असे या आरोपीचे नाव असून, गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने त्याला कोल्हापूर येथून अटक केली.
पुरोहित मूळचा राजस्थानचा. वर्षभरापूर्वी पुरोहितची दादरमधील एका कापड व्यापाऱ्यासोबत ओळख झाली होती. कोल्हापूर आणि पुण्यामध्ये अनेक कपड्यांचे कारखाने असल्याचे पुरोहितने व्यापाऱ्याला सांगितले होते. त्याच्या बोलबच्चनवर व्यापाऱ्याचा विश्वास बसला. पुरोहितच्या सल्ल्याने व्यवसायात फायदा होईल या हेतूने त्याने त्याच्या ओळखीतल्या दादरमधील अन्य व्यापाऱ्यांना एकत्र केले. या सर्वांची पुरोहितसोबत भेट घालून दिली. काही दिवसांनी पुरोहितने रोख पैसे देऊन या व्यापाऱ्यांकडून माल खरेदी केला. रोखीच्या व्यवहाराने व्यापाऱ्यांचा आणखी विश्वास बसला. हीच संधी साधून पुरोहितने या व्यापाऱ्यांकडून १ कोटी ४ लाखांचा माल उधारीवर घेतला. या खेपेस त्याने पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. काही महिने गेल्यानंतर व्यापाऱ्यांचा धीर सुटला. त्यांनी पुरोहितकडे पैशांसाठी तगादा लावला. अखेर पुरोहित मोबाइल बंद करून परागंदा झाल्याने व्यापाऱ्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या सर्वांनी मदतीसाठी गुन्हे शाखेकडे धाव घेतली होती. (प्रतिनिधी)