उमेदवारांची धिंड काढण्याचा शिराळकरांचा इशारा
By Admin | Updated: October 9, 2016 20:11 IST2016-10-09T20:11:15+5:302016-10-09T20:11:15+5:30
शिराळा येथील नागपंचमीबाबत शिराळकरांची एकी होऊ लागली आहे.

उमेदवारांची धिंड काढण्याचा शिराळकरांचा इशारा
ऑनलाइन लोकमत
शिराळा, दि. 9 - शिराळा येथील नागपंचमीबाबत शिराळकरांची एकी होऊ लागली आहे. नागपंचमीदिवशी आगामी सर्व निवडणुकांच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला होता. निवडणुकांवरील बहिष्काराबरोबरच आता जी व्यक्ती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करेल, त्याची गाढवावरून धिंड काढण्याचा इशारा शिराळकरांनी दिला आहे. चौकाचौकात तसे फलक लावल्याने, आगामी निवडणुकांना नेतेमंडळी कोणत्याप्रकारे सामोरे जाणार, याची जोरदार चर्चा शहरात आहे.
येथील जगप्रसिद्ध पारंपरिक नागपंचमीवर न्यायालयीन प्रक्रियेतून निर्बंध आले आहेत. गेली ११ वर्षे न्यायालयाचा मान राखत संयमाने नागपंचमी साजरी करण्यात येत आहे. परंपरागत चालत आलेल्या जिवंत नागपूजेवरही गतवर्षीपासून बंदी घालण्यात आल्याने शिराळकरांमध्ये तीव्र नाराजी आहे. याविरोधात शिराळकरांनी राजकीय, सामाजिक, न्यायालयीन पातळीवर आवाज उठविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. अखेर यंदाच्या नागपंचमीवेळी ग्रामस्थांनी आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. याचबरोबर नागपंचमीवेळी शहरात सर्वत्र काळे झेंडे फडकावत निवडणुकांवर बहिष्कार घालत असल्याचे फलक झळकवले. शिवाय नागपंचमी मिरवणुकीत सहभागी सर्व नाग मंडळांनीही निवडणुकांवर बहिष्काराचे फलक झळकावले होते. त्यावेळी सर्व राजकीय मंडळींनीही शहरवासीयांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले होते.
आता नगराध्यक्ष आरक्षण, जिल्हा परिषद निवडणुकांची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर हा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. रविवारी शहरात नवीन फलक झळकू लागले आहेत. यामध्ये गाढवाचे चित्र दर्शविण्यात आले असून, ह्यजो निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरेल, तो माझी सवारी करेलह्ण, असा मजकूर लिहिला आहे. येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नगरपंचायतीची पहिली निवडणूक होत आहे. यामुळे पहिला बहिष्कार या निवडणुकीवर होत आहे.