‘ईश्वरसाक्ष शपथे’चा आग्रह
By Admin | Updated: March 24, 2015 01:52 IST2015-03-24T01:52:55+5:302015-03-24T01:52:55+5:30
न्यायाधीशांनीच तसा आग्रह धरल्याने भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या एका सहायक आयुक्ताला तेथील न्यायालयात काही दिवसांपूर्वी साक्ष देता आली नाही.

‘ईश्वरसाक्ष शपथे’चा आग्रह
मुंबई : साक्षीदाराने फक्त ईश्वराला स्मरूनच शपथ घ्यायला हवी अशी कोणत्याही कायद्याची सक्ती नसूनही न्यायाधीशांनीच तसा आग्रह धरल्याने भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या एका सहायक आयुक्ताला तेथील न्यायालयात काही दिवसांपूर्वी साक्ष देता आली नाही. या उपायुक्ताने यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाकडे लेखी तक्रार करून संबंधित न्यायाधीशांना आपली साक्ष नोंदवून घेण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंती केली आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना कल्याण-भिवंडी रस्त्यावर एका राजकीय पक्षाचे बॅनर लावलेल्या मोटारीतून ६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. ती कारवाई भिवंडी-निजामपूर महापालिकेचे सहायक आयुक्त सुनील भालेराव यांच्या नेतृत्वाखालील तुकडीने केली होती. त्यासंदर्भात मोटारीचे मालक अशोक मिरचुमल थवाणी यांच्याविरुद्ध शांतीनगर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत भालेराव फिर्यादी होते. भालेराव हे भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या प्रभाग क्र. १चे प्रभाग अधिकारीही आहेत. यासंबंधीचे प्रकरण काही दिवसांपूर्वी भिवंडी येथील पाचव्या न्यायालयात न्यायाधीश डी. पी. काळे यांच्यापुढे सुनावणीस आले तेव्हा अभियोग पक्षाचे साक्षीदार म्हणून भालेराव यांना साक्षीसाठी बोलाविण्यात आले. साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे राहिल्यावर न्यायालयाच्या कर्मचाऱ्याने त्यांचे नाव, हुद्दा वगैरे तपशील नोंदवून घेतला व भवगद््गीतेवर हात ठेवून शपथ घेण्यास त्यांना सांगितले गेले. परंतु आपण निरिश्वरवादी असल्याने आपण ईश्वराला स्मरून किंवा गीतेवर हात ठेवून शपथ घेणार नाही. त्याऐवजी आपल्याला प्राणप्रिय असलेल्या भारतीय राज्यघटनेवर हात ठेवून आपण शपथ घेऊ, असे भालेराव यांनी सांगितले.
भालेराव यांनी उच्च न्यायालयाकडे केलेल्या तक्रारीनुसार न्यायाधीशांनी, हा तुमच्या पसंतीचा प्रश्न नाही, कायद्यानुसार तुम्हाला भगवद्गीतेवर हात ठेवूनच शपथ घ्यावी लागेल, असे सांगितले. भालेराव स्वत: मुंबई विद्यापीठाचे बी.एससी., एमएलएस, एल.एलबी., एल.एलएम, एम. ए. व पीएच.डी. आहेत. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २५ अन्वये प्रत्येक नागरिकास आपल्या पसंतीच्या धर्माचे अनुकरण करण्याचे अथवा कोणताही प्रस्थापित धर्म न स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आहे, असेही आपण न्यायालयास सांगून पाहिले. परंतु न्यायालयाने आपली साक्ष नोंदवून घेतली नाही. यापूर्वी ठाणे सत्र न्यायालयात आपल्याला राज्यघटनेला स्मरून शपथ घेऊन साक्ष देण्यास परवानगी दिली गेली होती, हेही त्यांनी निदर्शनास आणले.
फिर्यादी या नात्याने आपली साक्ष होणे महत्त्वाचे असल्याने उच्च न्यायालयाकडून आपल्याला दिलासा मिळेल, अशी भालेराव यांना अपेक्षा आहे. (विशेष प्रतिनिधी)
साक्षीदाराने साक्ष देण्यापूर्वी फक्त सत्य तेच सांगण्याची व सत्याशिवाय काही न सांगण्याची शपथ घ्यायला हवी, एवढेच कायदा सांगतो. ही साक्ष ईश्वराला स्मरून किंवा भगवद्गीतेवर हात ठेवूनच घेतली पाहिजे, अशी सक्ती नाही. एखाद्याने अशा प्रकारे साक्ष देण्यास नकार दिला म्हणून त्याने साक्ष द्यायला नकार दिला, असाही त्याचा अर्थ होत नाही. ‘इंडियन इव्हिडन्स अॅक्ट’च्या परिशिष्ट ६मध्ये सद्सद््विवेकबुद्धीला स्मरून शपथ घेण्याचीही तरतूद आहे.
ही घटना पहिलीच नाही
भालेराव यांना आलेला हा अनुभव पहिलाच नाही. कामगार राज्य विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झालेले कर्जत येथील डॉ. राजीव जोशी यांनी सरकारविरुद्ध भरपाईचा दावा केला होता. कल्याण न्यायालयात त्या दाव्यात साक्ष देताना ७ मार्च २०१३ रोजी असाच अनुभव आला होता. डॉ. जोशी व त्यांचे वकील अॅड. अत्रे यांनी कायदा आणि राज्यघटनेतील तरतुदी दाखविल्यानंतर न्यायाधीशांनी त्यांची साक्ष नोंदवून घेतली होती.