परिषदेत गदारोळ, कामकाज तहकूब
By Admin | Updated: March 11, 2015 01:50 IST2015-03-11T01:50:51+5:302015-03-11T01:50:51+5:30
राज्यातील वेगवेगळ्या भागांत अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये झालेली वाढ याबाबत विरोधी पक्षाने
परिषदेत गदारोळ, कामकाज तहकूब
मुंबई : राज्यातील वेगवेगळ्या भागांत अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये झालेली वाढ याबाबत विरोधी पक्षाने दाखल केलेला स्थगन प्रस्ताव स्वीकारण्यास सरकारने नकार दिल्याने विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या सदस्यांनी मंगळवारी गदारोळ केला. यामुळे सभागृहाचे कामकाज तीनवेळा तहकूब झाले व अखेरीस दिवसभराकरिता स्थगित करण्यात आले.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, राज्यातील ३५३ तालुक्यांपैकी २८४ तालुक्यांत सरासरीच्या २० ते ८० टक्के कमी पाऊस झाला आहे. ९३ लाख हेक्टर जमिनीवरील पिके दुष्काळामुळे नष्ट झाली. हे संकट कमी म्हणून की काय २१ फेब्रुवारी, १ व ८ मार्च रोजी झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला ठेवून दुष्काळ, गारपीट व शेतकऱ्यांच्या दुरवस्थेवर विरोधी पक्षाने दाखलेल्या स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा करावी. सभागृह नेते एकनाथ खडसे म्हणाले की, सत्ताधारी विरोधकांच्या एक पाऊल पुढे असून, सत्ताधारी पक्षाने यापूर्वीच याच विषयावर चर्चेचा प्रस्ताव दिला असल्याने स्थगन स्वीकारण्याची गरज नाही. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीही स्थगन प्रस्ताव स्वीकारण्यास विरोध केला.
यामुळे आक्रमक झालेले राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे सदस्य वेलमध्ये उतरून घोषणा देऊ लागले. यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. पुन्हा कामकाज सुरू झाले तेव्हा विरोधी पक्षनेते मुंडे म्हणाले की, अवकाळी पावसामुळे ७ लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे २५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे स्थगन स्वीकारलाच पाहिजे.
अवकाळी पाऊस व नुकसान यावर सत्ताधारी पक्षाचाही चर्चेचा प्रस्ताव असल्याने या विषयावर
कधी चर्चा केली जाईल ते बुधवारी कळवण्यात येईल, असे
उपसभापती वसंत डावखरे यांनी
जाहीर केले. विरोधी सदस्य घोषणाबाजी करीत असताना त्या
गोंधळात सत्ताधारी पक्षाने
शासकीय कामकाज मंजूर करवून घेतले. (विशेष प्रतिनिधी)