नववर्ष स्वागतयात्रेत नावीन्यपूर्ण कार्यक्रम
By Admin | Updated: March 1, 2017 03:35 IST2017-03-01T03:35:21+5:302017-03-01T03:35:21+5:30
विविध स्तरांतील, समाजातील ठाणेकरांचा सहभाग वाढावा यासाठी विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण कार्यक्रम करण्यावर आयोजकांचा भर आहे.

नववर्ष स्वागतयात्रेत नावीन्यपूर्ण कार्यक्रम
ठाणे : श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे काढण्यात येणाऱ्या यंदाच्या नववर्ष स्वागतयात्रेत विविध स्तरांतील, समाजातील ठाणेकरांचा सहभाग वाढावा यासाठी विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण कार्यक्रम करण्यावर आयोजकांचा भर आहे. याबाबत सोमवारी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यात उपस्थितांनी नाविन्यपूर्ण कल्पना मांडल्या.
यावर्षी गुढीपाडवा २८ मार्च रोजी असल्याने स्वागतयात्रेच्या रुपरेषेसंदर्भात कौपीनेश्वर मंदिर येथील ज्ञानकेंद्र सभागृहात बैठक संपन्न झाली. यात्रेतील सर्व घटकांचा सहभाग वाढविण्यासाठी आपापल्या स्तरावर प्रयत्न केला जाणार असल्याचे प्रत्येकाने सांगितले. सरस्वती क्रीडा संकुलाचे विद्यार्थी दरवर्षी यात्रेत जिम्नॅस्टीकचे प्रात्यक्षिके सादर करतात. ती पाडव्याच्या पूवर्संध्येलादेखील ठाणेकरांना पाहायला मिळणार आहेत. संस्कार भारतीच्या गौरी सोनक यांनी यंदा घंटाळी मैदानात काढण्यात येणाऱ्या रांगोळीतून नविन विषय हाताळला जाणार असल्याचे सांगितले. सारा फाऊंडेशनच्या सारंगी महाजन यांनी सर्जिकल स्ट्राईक हा यंदाच्या चित्ररथाचा विषय असल्याचे सांगून यात चित्रीकरण असेल व कलाकारांचा सहभागही असेल, असे त्यांनी सांगितले.
तरुणांना आकर्षित करण्यासाठी पारंपारिक वेशभूषेतला फॅशन शो घेण्याचे योगेश पिंगळे याने सूचित केले. राजेंद्र गोसावी यांनी सेल्फी पॉईण्ट तयार केले तसेच, फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेतली तर तरुणांचा सहभाग वाढेल अशी सूचना केली. त्यांच्या सूचनेला आयोजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
कार्यकारिणी सदस्य विद्याधर वालावलकर यांनी ग्राहक पंचायतीने ज्या विषयावर आंदोलन केले त्या विषयाला यात्रेच्या माध्यमातून चालना देण्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, वादकांचा, नृत्याचा, वक्तृत्वाचा रंगमंच बनवता येईल का याबाबत चर्चा केली. बैठकीच्या शेवटी श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे अध्यक्ष मा. य. गोखले यांनी यात्रेत सर्वांनी सहभाग घेण्याचे आवाहन केले.
तसेच, पुढच्या सभा ६ , १३ व २० मार्च रोजी होणार असल्याचे सांगितले. यावेळी अध्यक्ष संजीव ब्रह्मे, कार्यकारिणीच्या विश्वस्त - सचिव डॉ. अश्विनी बापट, निमंत्रक अंजली शेळके उपस्थित होते. (प्रतिनिधी)
>यावर्षीचे स्वागताध्यक्ष
डॉ. उदय निरगुडकर
यावर्षीच्या स्वागतयात्रेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर असतील, अशी घोषणा या बैठकीत करण्यात आली. गेल्यावर्षी हे पद कौपीनेश्वर मंदिराचे मुख्य विश्वस्त सुहास बाक्रे यांनी भूषविले होते.