कारच्या डिकीमध्ये कोंबून गुरांची अमानुष तस्करी
By Admin | Updated: October 20, 2016 03:32 IST2016-10-20T03:32:40+5:302016-10-20T03:32:40+5:30
महाराष्ट्रात गोवंश हत्येला कायद्याने बंदी असूनही अनेक मार्गांनी गोवंश कत्तलीसाठी नेण्याचे प्रकार घडत आहेत.

कारच्या डिकीमध्ये कोंबून गुरांची अमानुष तस्करी
वसई/पारोळ : महाराष्ट्रात गोवंश हत्येला कायद्याने बंदी असूनही अनेक मार्गांनी गोवंश कत्तलीसाठी नेण्याचे प्रकार घडत आहेत. यासाठी महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईला लागून असलेल्या गुजरात सीमावर्ती भागातून म्हणजेच मुंबई अहमदाबाद या महामार्गावरून अशा प्रकारची वाहतूक सुरूच असल्याचे पुन्हा एकदा मंगळवारी (१८ आॅक्टोबर) पहाटे घडलेल्या घटनेवरून सिद्ध झाले आहे.
महामार्गावरील खानिवडे टोलनाक्यावर पालघर पोलीस मुख्यालयातून गस्त ड्युटीवर तैनात असलेले सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव सूर्यवंशी हे गुजरात दिशेकडे जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी १८ आॅक्टोबरच्या पहाटे साडेपाचच्या सुमारास उभे होते. त्यावेळी त्यांना पाहून मुंबई दिशेने जाणाऱ्या एम एच ०१ व्ही ९१५२ या लाल रंगाच्या वेगनार गाडीच्या चालकाने गाडी रोडच्या साईडला उभी करून पाचारुखे गावाच्या बाजूने असलेल्या जंगलात गाडीतील तिघांनी पळ काढला.
सूर्यवंशी यांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, ते पळून गेले. यावेळी कारच्या पाठीमागील भाग हा अत्यंत दबलेला दिसला. तसेच प्रवासी गाडीत प्रवासी नसून काहीतरी वजनदार माल भरल्याचा सूर्यवंशी यांना संशय आला. अगदी जवळून पाहिले असता त्यांना. गाडीच्या मागच्या सीट काढून त्यामध्ये एक तांबड्या रंगाची गाय व एक सफेद रंगाच्या बैलाला अतिशय अमानुषपणे अरुंद जागेत हातपाय बांधून दुमडून कोंबले होते. त्यामुळे त्यांनी टोलनाक्यावरील जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना जनावरे चोर पळत असल्याचे ओरडून सांगितले. याचवेळी पोलीस कर्मचारी नरसाळे व घेरे यांना कळविले. दरम्यान, सूर्यवंशी यांनी दिलेल्या आवाजामुळे शेजारील पाड्यात राहणारे रवींद्र केशव ठाकरे, बाबल्या मधुकर ठाकरे व प्रकाश मन्या तुंबडा यांनी दोन इसमांना झाडीतून पकडून आणले. (वार्ताहर)
>दोघा तस्करांना पकडले; मुख्य आरोपी पळाला
पळून जाताना पकडून आणलेले इरफान सलीम सय्यद (३३) राहणार रेती बंदर कल्याण व व मुर्तुजा ऊर्फ अल्ताफ मुस्तफा शहा (२०) राहणार भिवंडी यांना सूर्यवंशी यांनी आलेल्या मांडवी पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, अन्सार नावाचा मुख्य आरोपी फरार झाला. मांडवी पोलीस, सूर्यवंशी व या भागातील समाज सेवक बंडू गावंड यांनी सदर गायीला व बैलाला जवळच असलेल्या जिवद्या मंडळ मुंबई यांच्या गोशाळेत नेवून तेथील डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले आहे. गाडीतील हे गोवंश घुसमटून उलटे करून बांधलेले व बेशुद्ध अवस्थेत होते.
दोन इंजेक्शन व लाल रंगाची बाटली
तसेच गाडीच्या डेस्क बोर्डमध्ये दोन इंजेक्शन व लाल रंगाची बाटली सापडून आली असून याद्वारे गोवंशाला बेहोश केल्याचे समजले. तसेच हे गोवंश फरार आरोपी अन्सार यांच्या सांगण्यावरून चारोटी जवळील भागातून आल्याचेही पकडलेल्या आरोपींनी पोलिसांना सांगितले.
मांडवी पोलिसांनी आरोपी व गाडी त्यांच्या ताब्यात घेऊन या गुन्ह्याची नोंद केली असून फरार आरोपीचा तपास सुरु केला आहे. मोकाट फिरणाऱ्या जनावरांना भूल देणारे इंजेक्शन देऊन प्रथम बेशुद्ध केले जाते. त्यानंतर त्यांना वरील प्रमाणाच्या प्रवाशी वाहनात क्रूरतेने कोंबून वाहतूक केली जाते. मोकाट जनावरे पहाटेच्यावेळी विश्रांती करत नाक्यावर किंवा मोकळ्या जागेत बसलेले असतात याचा फायदा गो तस्कर घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.