मेव्हण्याने केली जावयाची अमानुष हत्या
By Admin | Updated: August 8, 2016 14:39 IST2016-08-08T14:38:44+5:302016-08-08T14:39:00+5:30
बहिणीला होणारा त्रास अन् आर्थिक व्यवहारातून वैमनस्य आल्यामुळे मेव्हण्याने त्याच्या जावयाची अमानुष हत्या केल्याची घटना नागपूरमध्ये घडली.

मेव्हण्याने केली जावयाची अमानुष हत्या
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ८ - बहिणीला होणारा त्रास अन् आर्थिक व्यवहारातून वैमनस्य आल्यामुळे मेव्हण्याने त्याच्या जावयाची अमानुष हत्या केली. रविवारी सकाळी नंदनवनमध्ये ही थरारक घटना घडली. अरविंद रुपचंद पराते असे मृताचे नाव आहे.
गुन्हेगारी वृत्तीचा अरविंद वादग्रस्त प्रॉपर्टी डिलींगचे काम करायचा. पपत्नी अलकाचा तो शारिरिक आणि मानसिक छळ करीत होता. अलकाचा भाऊ आरोपी राजू महादेव वंजारी आणि त्याचा भाऊ गज्जू हा एका गुन्हेगारी टोळीतील सदस्य असून, त्याच्यावरही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अलकाचा छळ होत असल्यामुळे राजू आणि गज्जूचे जावई अरविंदसोबत अजिबात पटत नव्हते. एका वादग्रस्त मालमत्तेच्या आर्थिक व्यवहारातूनही त्यांच्यात वैमनस्य आले होते. त्यामुळे त्यांच्यात वारंवार खटके उडायचे. दोन-तीन दिवसांपासून अलका हिला मारहाण करणे, शिवीगाळ करणे वाढल्याने अलकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. घरगुती वाद म्हणून पोलिसांनी दोघांनाही समज दिली. त्यानंतर अलका माहेरी निघून गेली.
रविवारी नागपंचमीचा सण असल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. सकाळी ८.३० च्या सुमारास अरविंद सास-याच्या घरी आला आणि पत्नी अलकाला घरी नेण्यासाठी जबरदस्ती करू लागला. अलकाची त्याच्यासोबत जाण्याची ईच्छा नसल्याने तिचा भाऊ आरोपी राजू याने अरविंदला तेथून हुसकावण्याचा प्रयत्न केला. परिणामी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात राजूने बाजूची काठी उचलून अरविंदला बदडणे सुरू केले. नंतर दगड, विटा, वरवंटा, फरशीचा तुकडा, धारदार शस्त्र असे हातात येईल ते उचलून आरोपी राजूने अरविंदला अक्षरश: ठेचून काढले. त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर आरोपी पळून गेला. या घटनेमुळे परिसरात थरार निर्माण झाला. माहिती कळताच नंदनवनचा पोलीस ताफा पोहचला. त्यांनी अरविंदचे वडील रुपचंद महादेव पराते यांच्या तक्रारीवरून आरोपी राजूविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
सासरच्यांनीच केले अंत्यसंस्कार
अरविंदचे परिसरात फारसे कुणाशी पटत नव्हते. नातेवाईकही त्याच्यासोबत फटकून वागत होते. त्याची हत्या झाल्यानंतर सासरच्यांनीच मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. या हत्या प्रकरणात आरोपी राजूचा भाऊ गज्जू याची काय भूमिका आहे, त्याचा पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, अटक केल्यानंतर आरोपी राजूचा रक्तदाब आणि शूगर अचानक वाढली. त्याची प्रकृती खालावल्याने पोलिसांनी त्याला रुग्णालयात भरती केले.