अमलीपदार्थांची तस्करी रोखण्यासाठी इन्फोलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 01:56 IST2016-07-29T01:56:03+5:302016-07-29T01:56:03+5:30
अमलीपदार्थांचे तस्कर आणि सेवन करणाऱ्यांवर पोलिसांचा आॅन ड्युटी २४ तास वॉच असणार आहे. यासाठी पोलिसांनी बुधवारपासून ‘इन्फोलाइन’ सुरू केली आहे. ९८१९१११२२२

अमलीपदार्थांची तस्करी रोखण्यासाठी इन्फोलाइन
मुंबई : अमलीपदार्थांचे तस्कर आणि सेवन करणाऱ्यांवर पोलिसांचा आॅन ड्युटी २४ तास वॉच असणार आहे. यासाठी पोलिसांनी बुधवारपासून ‘इन्फोलाइन’ सुरू केली आहे. ९८१९१११२२२ ही इन्फोलाइन सर्वसामान्य नागरिकांसाठी बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे.
एकेकाळी दारू, सिगरेटच्या असलेल्या क्रेझची जागा चरस, हेरॉईन, गांजा, कोकेन आणि एमडीने घेतली आहे. त्यात चरस, गांजा यांचे धूर हवेत विरघळत असताना एमडीसारखे केमिकलयुक्त ड्रग्ज वाढल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहावयास मिळते. दिवसेंदिवस अमलीपदार्थांचा वाढता वेग, त्यात गुरफटत जाणारी तरुणाई यावर रोख आणणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. अमलीपदार्थ विरोधी पथकाकडून यावर वेळोवेळी कारवाई केली जाते. पोलिसांनी सुरू केलेल्या या इन्फोलाइनमुळे सर्वसामान्य नागरिक याला जोडले जाणार आहेत.
ही इन्फोलाइन २४*७ सुरु राहणार आहे. या इन्फोलाईन सामान्य नागरिक फोन अथवा एमएमएस द्वारे नागरिकांशी जोडले जाणार आहे. त्यांच्या नजरेत अंमली पदार्थ सेवन करणारे अथवा विक्री करणारे आढळल्यास त्यांनी तत्काळ याची इन्फोलाईनवर शेअर करता येणार आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे यावर नियंत्रण असणार आहे. नागरिक आणि अंमली पदार्थ विरोधी पथक एकत्र आल्यास यावर कारवाई करण्यास मदत होईल असा विश्वास मुंबई पोलिसांना आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहत या इन्फोलाईनवर अधिकाधिक माहिती पुरवावी असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. (प्रतिनिधी)