शालेय वस्तूंनाही बसली महागाईची झळ
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:05+5:302016-06-07T07:43:05+5:30
उन्हाळ्याच्या सुट्टीचा अखेरचा आठवडा सुरू असून, येत्या शैक्षणिक वर्षासाठी शालेय वस्तूंची खरेदी करण्यासाठी पालकांची लगबग सुरू आहे.

शालेय वस्तूंनाही बसली महागाईची झळ
लीनल गावडे
मुंबई- उन्हाळ्याच्या सुट्टीचा अखेरचा आठवडा सुरू असून, येत्या शैक्षणिक वर्षासाठी शालेय वस्तूंची खरेदी करण्यासाठी पालकांची लगबग सुरू आहे. नवीन पुस्तके, बॉटर बॅग आणि खाऊचा डबा मिळणार म्हणून चिमुरड्यांमध्ये उत्साह आहे. तर या वस्तूंच्या किमतींत १0 ते १५ टक्यांनी वाढ झाल्याने पालकवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी शहर आणि उपनगरातील प्रमुख बाजारपेठांत गर्दी आहे. दादर कीर्ती मार्केट, सीएसटी येथील अब्दुल रेहमान स्ट्रीट, मशीद बंदर स्थानकाबाहेर, फोर्ट परिसर, लालबाग आणि घाटकोपर या ठिकाणी पालक विद्यार्थ्यांसोबत खरेदी करताना दिसत आहेत. मुलांचे आवडते रंग आणि कार्टूनच्या वस्तू अधिक खपत असल्याची माहिती दुकानदार समीर शेख यांनी दिली. त्यांनी सांगितले की, यंदा वस्तूंच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. मात्र त्याचा खरेदीवर म्हणावा तितका परिणाम दिसत नाही. मात्र शाळा सुरू होईपर्यंत वस्तूंच्या किमतींत आणखी वाढ होण्याची शक्यताही शेख यांनी वर्तवली.
लहान मुलांना खोडरबर, पेन्सील दिवसाआड लागतात; शिवाय या वस्तू नेहमीच हरवतात. त्यामुळे एकाचवेळी मोठ्या संख्येने वस्तू खरेदी करत असल्याचे घाटकोपर येथील प्रणिता सावंत यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा पुन्हा खरेदी करण्याची कटकट नसते. शिवाय स्वस्तातही मिळतात. तरन्नुम पठाण म्हणाल्या की, बॅगच्या किंमतीत अधिक वाढ दिसत आहे. उत्तम बॅग ३५० रुपयांपर्यंत आहे. मात्र मुलांच्या आवडीसाठी किंमतीत झालेल्या वाढीकडे दुर्लक्ष करीत खरेदी करावी लागतेच.
>‘मेड इन चायना’ सरस
स्वस्त आणि मस्त वस्तूंसाठी ‘मेड इन चायना’च्या वस्तू ओळखल्या जातात. यंदाही दप्तर, कंपास, पाण्याची बाटली, डबा यांमध्ये चिनी वस्तूंना मागणी आहे. विशेष म्हणजे लहानग्यांनाही या वस्तू आकर्षित करीत असल्याच्या प्रतिक्रिया दुकानदारांनी व्यक्त केल्या.