इचोरीत डेंग्यूसदृश आजाराचे थैमान
By Admin | Updated: September 12, 2014 01:54 IST2014-09-12T01:54:10+5:302014-09-12T01:54:10+5:30
मंगरुळपीर तालुक्यातील तीन बालके दगावली.

इचोरीत डेंग्यूसदृश आजाराचे थैमान
मंगरुळपीर : तालुक्यातील इचोरी गावात डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले असून, यात तीन बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदर घटनेनंतर आरोग्य यंत्रणेची झोप उडाली असून, आणखी काही बालकांवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. कासोळा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या इचोरी गावात आठवडाभरापासून डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. या आजाराने तीन बालकांचा बळी घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. सर्वप्रथम दि. ३ सप्टेंबर रोजी ५ वर्षीय पूजा राहुल कांबळे या बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. १0 सप्टेंबरच्या रात्री शिवानंद सोपान घोडके (वय १४ वर्ष), शिवाजी विजय नागरे (वय ५ वर्ष) यांचा वाशिम येथे उ पचारादरम्यान मृत्यू झाला. गावातील आणखी काही बालकांना या आजाराने ग्रासले असून, त्यांच्यावर वेगवेगळय़ा ठिकाणी खासगी दवाखान्यात उपचार चालू असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. दहा दिवसांपूर्वी इचोरी व कासोळा येथील रक्ताचे नमुने अकोला येथे पाठविण्यात आले. त्यातून डेंग्यूची लागण नसल्याचे निष्पन्न झाल्याचे तालुका आरोग्य अधिकार्यांनी सांगितले. सदर आजाराची लक्षणे दिसताच ताप आल्यानंतर ८ ते १0 तासात बालके दगावली. एकाच रात्री दोन बालके दगावल्यानंतर आरोग्य विभागानेही इचोरी येथे धूर फवारणी केल्याचे सांगितले. ११ सप्टेंबर रोजी गावात दिवसभर आरोग्य विभागाकडून घरोघरी भेटी, उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सदर डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहे. आरोग्य विभागाने गावातील पिण्याचे पाणी व अस्वच्छतेमुळे तापीचा फैलाव झाल्याचे सांगितले.