लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशाचा जेम्स आणि ज्वेलरी उद्योग जागतिक व्यापाराच्या केंद्रस्थानी आहे. त्याला आणखी चालना देण्यासाठी याूपर्वी महत्त्वाची पावले उचलली गेली आहेत. त्यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर करण्याचे स्वप्न साकारले जाणार आहे, असे मत ‘दिव्यज फाउंडेशन’च्या संस्थापक अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.
गोरेगाव येथील नेस्को मैदानावर बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे १७व्या ‘इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शो (आयआयजेएस) सिग्नेचर जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड शो’चे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी फडणवीस बोलत होत्या. राज्यात या क्षेत्रात उद्योग वृद्धीसाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही अमृता फडणवीस यांनी दिली. याप्रसंगी जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष (जीजेईपीसी) विपुल शाह, उपाध्यक्ष किरीट भन्साळी, कार्यकारी संचालक सब्यासची राय, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्सचे डायरेक्टर आर. अरुलानंदन, राज्याच्या उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्रसिंग कुशवाह, सेन्को गोल्ड अँड डायमंडचे कार्यकारी संचालक सुवंकर सेन आणि राष्ट्रीय प्रदर्शनाचे संयोजक नीरव भन्साळी उपस्थित होते.
यावेळी विपुल शाह म्हणाले, मुंबईत देशातील पहिल्या ज्वेलरी पार्कचे बांधकाम या महिन्यात सुरू होणार आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याने पुरवठा साखळी मजबूत होईल.
या प्रदर्शनाला सुमारे २५ हजार ते ३० हजार लोक भेट देतील, अशी अपेक्षा आहे. ६० देशांतील ८०० शहरांतील लोक या प्रदर्शनाला आले आहेत. त्यातून ५० हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाची अपेक्षा आहे, असे किरीट भन्साळी यांनी नमूद केले. तर या क्षेत्रातील व्यापारातील समस्या जाणून घेण्यासाठी काम केले जात आहे, असे आर. अरुलानंदन यांनी नमूद केले.
सहकार्य वाढवायला हवे : लोढा
आयआयजेएस प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते बीकेसीतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे शनिवारी करण्यात आले. हे प्रदर्शन ७ जानेवारीपर्यंत सुरू असेल. मनुष्यबळाचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि या क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी जीजेईपीसी आणि राज्य सरकारने कौशल्य विकास आणि प्रमाणपत्रे देण्याच्या क्षेत्रात सहकार्य वाढवले पाहिजे, असे मत लोढा यांनी यावेळी मांडले.