भारतीय पेमेंट गेटवे ‘रुपे’ राष्ट्रपतींनी केले राष्ट्रार्पण

By Admin | Updated: May 8, 2014 23:37 IST2014-05-08T23:37:05+5:302014-05-08T23:37:05+5:30

‘व्हिसा’ व ‘मास्टरकार्ड’च्या तोडीस तोड असलेली ‘रुपे’ (फ४ढं८) ही भारताची संपूर्णपणे देशी व स्वत:ची पेमेंट गेटवे यंत्रणा गुरुवारी औपचारिकपणे कार्यान्वित झाली.

Indian payment gateway 'Rupee' made national president nationwide | भारतीय पेमेंट गेटवे ‘रुपे’ राष्ट्रपतींनी केले राष्ट्रार्पण

भारतीय पेमेंट गेटवे ‘रुपे’ राष्ट्रपतींनी केले राष्ट्रार्पण

नवी दिल्ली : ‘व्हिसा’ व ‘मास्टरकार्ड’च्या तोडीस तोड असलेली ‘रुपे’ (फ४ढं८) ही भारताची संपूर्णपणे देशी व स्वत:ची पेमेंट गेटवे यंत्रणा गुरुवारी औपचारिकपणे कार्यान्वित झाली. या यंत्रणेचा वापर करून ग्राहकांना एटीएमवरून पैसे काढणे व क्रेडिट आणि डेबिट कार्डावर खरेदी करणे असे व्यवहार करता येतील. तंत्रज्ञानासाठी परकीय मक्तेदारी कंपन्यांना पैसे द्यावे लागणार नसल्याने ‘रुपे’च्या माध्यमातून व्यवहार करणे ग्राहक व बँका या दोघांच्याही दृष्टीने अधिक किफायतशीर असणार आहे. राष्ट्रपती भवनात झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पहिल्या देशी ‘रुपे’ कार्डाचे अनावरण केले. ही व्यवस्था राष्ट्राला अर्पण करताना राष्ट्रपती म्हणाले की, स्वत:ची स्वतंत्र अशी कार्ड पेमेंट गेटवे यंत्रणा असणार्‍या जगातील मोजक्या देशांमध्ये आता भारताने स्थान पटकाविले आहे. मुखर्जी म्हणाले की, ‘रुपे’मुळे रोख स्वरूपात केल्या जाणार्‍या व्यवहारांमध्ये घट होईल, एवढेच नव्हे तर त्यामुळे ग्राहकांना देशांतर्गत व्यवहार करण्यासाठी विविध पर्यायही उपलब्ध होतील. ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन आॅफ इंडिया’ने (एनपीसीआय) ‘रुपे’ प्लॅटफॉर्म विकसित केला असून पैशाच्या व्यवहारांच्या क्लिअरिंग व सेटलमेंटसाठी आयसीआयसीआय, स्टेट बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक यांच्यासह इतरही काही बँकांनी त्याचा वापर सुरूही केला आहे. आयआरसीटीसी प्रिपेड स्वरूपाचे ‘रुपे’ कार्ड लवकरच सुरू करणार असून ते वापरून रेल्वे तिकिटांची खरेदी व आरक्षण केले जाऊ शकेल. ‘एनपीसीआय’चे अध्यक्ष एम. बालचंद्रन यांनी सांगितले की, ‘रुपे’ कार्ड परदेशातही नेण्याची महामंडळाची योजना असून त्यासाठी अमेरिकेतील डिस्कव्हर फिनान्शियल सर्व्हिसेस व जपानमधील ‘जेडीसी’ यांच्यासोबत भागीदारीसाठी चर्चा सुरू आहे. केंद्रीय वित्तमंत्रालयातील वित्तीय सेवा विभागाचे सचिव जी. एस. सिद्धू यांनी यावेळी सांगितले की, ‘रुपे’ची सेवा सध्या वापरल्या जाणार्‍या आंतरराष्ट्रीय कार्डांच्या तुलनेत बर्‍याच कमी खर्चात उपलब्ध होईल. ‘रुपे’चा वापर केल्याने बँकांना प्रत्येक व्यवहाराच्या क्लिअरिंग व सेटलमेंटसाठी अन्य आंतरराष्ट्रीय पेमेंट प्लॅटफॉर्मच्या तुलनेत ४० टक्के कमी खर्च येईल, असेही त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

सिद्धू यांनी असेही सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ‘रुपे’ कार्ड वापरता येऊ शकतील असे २५,३३१ एटीएम याआधीच कार्यान्वित केले असून चालू वित्तीय वर्षात तसे आणखी ९,००० एटीम सुरू केले जातील. देशातील सर्व १.६ लाख एटीएमवर, कार्डावर रक्कम स्वीकारणार्‍या ९.४५ लाखपैकी ९५ टक्के व्यापारी आस्थापनांमध्ये व ई-कॉमर्सने व्यापार करणार्‍या १० हजार व्यापारी कंपन्यांपैकी बहुतांश ठिकाणी ‘रुपे’ कार्ड वापरता येऊ शकेल.

Web Title: Indian payment gateway 'Rupee' made national president nationwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.