भारतीय जैन संघटनेचे अधिवेशन उद्या बाहुबलीत
By Admin | Updated: January 9, 2016 00:54 IST2016-01-08T23:51:06+5:302016-01-09T00:54:05+5:30
देशभरातून सात हजार कार्यकर्ते येणार

भारतीय जैन संघटनेचे अधिवेशन उद्या बाहुबलीत
बाहुबली : भारतीय जैन संघटनेचे ११वे द्वैवार्षिक अधिवेशन उद्या, रविवारी (दि. १0) बाहुबली (कुंभोजगिरी, ता. हातकणंगले)
येथे होणार आहे. संघटनेच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसोबतच राज्यभरातून पाच ते सात हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष पारस ओसवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.अधिवेशनाचे उद्घाटन रविवारी सकाळी १० वाजता संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथा आणि सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे.ओसवाल म्हणाले, महाराष्ट्रातून सुरू झालेले जैन संघटनेचे काम सध्या अनेक राज्यांमध्ये विस्तारलेले आहे. केवळ जैनच नाही, तर सर्वच समाजातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे. लातूर, गुजरातमधील भूज, उत्तराखंड व जम्मू-काश्मीरमध्ये भूकंप पीडितांना मदत असो अथवा नैसर्गिक आपत्ती सर्वच ठिकाणी संघटनेने भरीव मदत केली आहे. बाहुबली येथे होणाऱ्या अधिवेशनात पुढील दोन वर्षांमध्ये संघटनेच्या वतीने करण्यात येणारे सामाजिक काम, शेतकरी व शेतीसाठीचे प्रयत्न त्याचबरोबर जैन समाजासमोरील अडचणींवर चर्चा केली जाणार आहे.
व्यवसायाच्या निमित्ताने जैन समाज देशभरात विखुरलेला आहे. त्यांना एकत्र करणे व समाजासाठी विधायक कार्य करण्याचे यशस्वी प्रयत्न करीत आहे. या अधिवेशनामध्ये अल्पसंख्यांक जैन समाजाला भेडसावणारे प्रश्न याबाबतही विचारमंथन होणार आहे.
या राज्य अधिवेशनात नवीन वर्षासाठी राज्य अध्यक्षांची घोषणा होणार आहे. अधिवेशनाला जैन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पारस ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी अभिनंदन खोत, प्रकाश मुंगळी, ऋषभ छाजेड, सुरेश मगदूम, शैला पाटील व डॉ. शीतल पाटील, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
तयारी पूर्ण
अधिवेशनासाठी बाहुबली येथे साधारण वीस ते पंचवीस हजार श्रावक बसतील इतका मंडप उभा करण्यात आलेला आहे. बाजूलाच पार्किंगसाठी मोकळी जागा आहे. बाहुबलीसह पन्हाळा, शिरोली, कोल्हापूर येथील जैन मंदिरात कार्यकर्त्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून आहे. अधिवेशनासाठी विविध विभाग करण्यात आले असून त्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.