सलग दुसऱ्यांदा सुनीत ठरला ‘भारत श्री’
By Admin | Updated: March 6, 2017 05:01 IST2017-03-06T05:01:33+5:302017-03-06T05:01:33+5:30
सुनीत जाधवने आपल्या लौकिकास साजेसे अप्रतिम प्रदर्शन करताना सलग दुसऱ्यावर्षी भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली

सलग दुसऱ्यांदा सुनीत ठरला ‘भारत श्री’
मुंबई : पीळदार शरीरयष्टीच्या महाराष्ट्रीयन सुनीत जाधवने आपल्या लौकिकास साजेसे अप्रतिम प्रदर्शन करताना सलग दुसऱ्यावर्षी भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली. महिला गटात मणिपूरच्या सरिता थिंगबैजमने पुन्हा एकदा बाजी मारली. दरम्यान, सांघिक गटात बलाढ्य रेल्वेने वर्चस्व कायम राखले असून महाराष्ट्र आणि सेनादलाला संयुक्तपणे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
गुरगाव येथील लेझर व्हॅलीत झालेल्या या स्पर्धेत प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली. शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत रेल्वेच्या खेळाडूंचा भरणा अधिक होता. गतविजेत्या सुनीतसह राम निवास, जावेद अली खान, महेश्वरन आणि सर्बो सिंग यांच्यामध्ये रंगतदार लढत झाली. सात पोजेसनंतर सुनीत आणि राम निवासचे गुण समान झाले. अखेर कंपेरिझनमध्ये सुनीतने बाजी मारत ‘चॅम्पियन्स आॅफ चॅम्पियन’ पुरस्कारावर कब्जा केला.
रामनिवासला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले, तर तिसरा क्रमांक सेनादलाच्या दयानंद सिंग याने मिळविला. बेस्ट पोझरचा पुरस्कार सर्बो सिंगने पटकावला. मुंबई श्री विजेता अतुल आंब्रेला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
सांघिक गटात रेल्वेच्या १२ खेळाडूंपैकी ९ खेळाडूंनी पदकांवर नाव कोरले. या कामगिरीच्या जोरावर रेल्वेने ८५ गुण मिळवित सांघिक विजेतेपदाला गवसणी घातली. महाराष्ट्र संघाने दोन सुवर्ण पदकांसह दोन रौप्य जिंकले आणि सेनादलाने २ सुवर्ण आणि ४ कांस्य जिंकत ४५ गुण मिळवले. या दोन्ही संघांची गुणसंख्या समान असल्याने दोघांना संयुक्त सांघिक उपविजेत्याचा मान देण्यात आला. (क्रीडा प्रतिनिधी)
>सरिता देवी अव्वल
महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत मणिपूरच्या सरिता देवीने पुन्हा मिस इंडिया होण्याचा बहुमान संपादला. दिल्लीची ममोता यमनम दुसरी आली. महाराष्ट्राच्या कांची अडवाणी आणि लीला फड यांना चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरच राहावे लागले.
>वजनी गटनिहाय निकाल
५५ किलो : १. नितीन म्हात्रे (महाराष्ट्र), २. पुंदन गोपे ( रेल्वे), ३.. अरूण साहू (सेनादल)
६० किलो : १. प्रदीप वर्मा (पंजाब), २. वैभव महाजन (रेल्वे), ३. रामा मलिक (हिमाचल प्रदेश)
६५ किलो : १. अनिल गोचीकर (ओडिशा), २. एस. भास्करन (रेल्वे), ३. संदीप (नवी दिल्ली)
७0 किलो : १. राजू खान (नवी दिल्ली), २. हरी राम (सीआरपीएफ), ३. अरनॉल्ड फज (प.बंगाल)
७५ किलो : १. सर्बो सिंग (रेल्वे), २. सागर कातुर्डे (महाराष्ट्र), ३. प्रशांत कन्नुकर (सेनादल)
८0 किलो : १. बी.महेश्वरन (सेनादल), २. मोहन सुब्रमण्यम (रेल्वे), ३. आर.के.मलिक (सेनादल)
८५ किलो : १. दयानंद सिंग (सेनादल), २. प्रीतम चौगुले (रेल्वे), ३. श्रीकांत सोम (उत्तर प्रदेश)
९० किलो : १. सुनीत जाधव (महाराष्ट्र), २. सागर जाधव (रेल्वे), ३. राजेंद्रन मणी (तामिळनाडू)
९0 ते १०० किलो : १. राम निवास (रेल्वे),
२. किरण पाटील (रेल्वे), ३. एस.के.शुक्ला (सेनादल)
१०० किलोवरील :
१. जावेद अली खान (रेल्वे), २. झुबेर शेख (महाराष्ट्र),
३. पवन कुमार (गुजरात)