भारत आमचाही आहे, आम्हालाही बरोबर घ्या!
By Admin | Updated: February 5, 2015 01:45 IST2015-02-05T01:45:01+5:302015-02-05T01:45:01+5:30
महाराष्ट्रात अतिशय मागास असलेल्या मुस्लिमांना आरक्षण देऊन मुख्य प्रवाहात सामील करून घ्यावे,असे आवाहन खासदार बॅ. असदुद्दीन ओवैसी यांनी बुधवारी केले.

भारत आमचाही आहे, आम्हालाही बरोबर घ्या!
ओवैसींचे आवाहन : जिहादींची नव्हे, शिक्षणाची कास धरा
पुणे : मुस्लीम तरुणांनी जिहादी माथेफिरुंच्या नादी न लागता शिक्षणाची कास धरावी आणि पंतप्रधान मोदी यांनीही ‘सबका साथ सबका विकास’ या आपल्या वचनाला जागून महाराष्ट्रात अतिशय मागास असलेल्या मुस्लिमांना आरक्षण देऊन मुख्य प्रवाहात सामील करून घ्यावे, असे आवाहन आॅल इंडिया मजलीस-ए इत्तिहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष व खासदार बॅ. असदुद्दीन ओवैसी यांनी बुधवारी केले.
कोंढवा येथील कौसरबागेत सायंकाळी झालेली मुस्लिम आरक्षण परिषद आणि त्या आधी घेतलेली पत्रकार परिषद यात बोलताना ओवैसी म्हणाले की, भारत बलशाली राष्ट्र व्हावे, हे आमचेही स्वप्न आहे. मात्र ११ टक्के एवढ्या मोठ्या अल्पसंख्येने असलेल्या मुस्लीम समाजास बाजुला ठेवून/बाजुला राहून हे शक्य होणार नाही. भारतीय मुस्लिम दुय्यम दर्जाचे नव्हे तर अव्वल दर्जाचे नागरिक आहेत. हिंदुंचे जेवढे प्रेम या देशावर आहे, तेवढेच आमचेही आहे. या देशाची भूमी आमचीही आहे. त्यामुळे मुस्लिमांकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याची गरज आहे, यावर त्यांनी भर दिला.
‘इसिस’ संघटना ही खुनी आहे. तिला इस्लाम समजलेला नाही. इस्लामने या संघटनेला ‘हवारीज’ (इस्लामशी संबंध नसलेली) घोषित केले आहे. जिहादच्या नावाखाली तरुणांना भडकावले जाते. मुस्लिम तरुणांनी याकडे लक्ष न देता शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. इसिसच्या कारवाया मिडीयाच्या माध्यामातून मुस्लिम तरुणांपर्यंत पोहचविल्या जात आहेत. त्याला आमचा तीव्र विरोध राहिल, असे ओवैसी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मेहमूद रहमान समितीने आपल्या अहवालात यापूर्वीच्या आघाडी सरकारला १५ प्रकारच्या शिफारशी केल्या होत्या. त्यातील चौदावी शिफारस आरक्षणाची आहे. मात्र केवळ अध्यादेश काढून या सरकारने मुस्लिमांच्या पाठीत खंजीर खुपसला. संघ परिवार धर्मावर आधारित आरक्षण देऊ नये असे म्हणत आहे. मात्र आमची मागणीच मागासलेपणावर आधारित आरक्षणाची आहे, असे त्यांनी मुस्लीम आरक्षण परिषदेत स्पष्ट केले.
या परिषदेस उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, एआयएमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, आमदार वारिस पठाण, प्रदेशाध्यक्ष मोईन खान, छावा युवा संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, भारिपचे महासचिव वसंत साळवे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्यासह अॅक्शन कमिट महाराष्ट्र व मूल निवासी मुस्लिम मंचाचे पदाधिकारी व्यासपीठावर होते. (प्रतिनिधी)
च्देशात विविध कारागृहांतील कैद्यांपैकी ३६ टक्के मुस्लिम आहेत. त्यातील २७ टक्के लोकांना शिक्षा झाली आहे. याचा अर्थ पोलिसांनी अनेकांवर खोटे खटले भरले आहेत. पण असे खटले भरल्याबद्दल किती पोलिसांवर कारवाई झाली? पुरावा असेल तर त्यांच्यावर खटले चालवा. शिक्षा द्या, नाही तर सोडून द्या, असे ओवेसी यांनी सांगितले़
च्तत्पूर्वी एका पत्रकार परिषदेतही त्यांनी हाच मुद्दा मांडताना सांगितले की, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा खटला सीबीआयने ७ महिन्यांत जलदगतीने चालवून त्यांना दोषमुक्त केले. त्याच धर्तीवर देशभरातील दहशतवादी कारवायांच्या खटल्यांची दैनदिन सुनावणी घेऊन तात्काळ निपटारा केला जावा़
लंदन के कपडे पहन गये...
आपण प्रक्षोभक भाषणे करतो असा आरोप करणाऱ्यांनी एकदा समोरासमोर येऊन माझ्याशी सामना करावा. मी एकटा शंभर जणांना पुरा पडेन, असे सांगून ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या नावाची वीण असलेला सुट परिधान केला. उन्होने स्वच्छ भारत बोलते बोलते लंदन के कपडे पहन लिये. लेकिन इस देश के गरीबोंके बदन पर कैसे कपडे है, ये देखेंगे या नहीं? ’
रा. स्व. संघाला टोला : प्रत्येक हिंदूने १० मुलांना जन्म द्यावा, असे वक्तव्य संघ परिवारातील काही नेत्यांनी नुकतेच केले होते. मात्र असे वक्तव्य करणाऱ्यांनी प्रथम १० मुले जन्माला घालावी आणि मग इतरांना सांगावे, असा टोला ओवैसी यांनी लगावला.
मुंबईत सभा : एआयएमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांची मुंबईत शनिवारी सभा होणार आहे. नागपाडा जंक्शन येथे सायंकाळी सात वाजता होणाऱ्या या सभेस पोलिसांनी परवानगी दिली असल्याची माहिती पक्षाचे आमदार वारिस पठाण यांनी दिली.
शिवसेनेची निदर्शने
शिवसेना कार्यकर्त्यांनी खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या निषेधाच्या घोषणा देत कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावरील चौकांत बुधवारी सायंकाळी निदर्शने केली. पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे सभेच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे ४०० कार्यकर्त्यांना विविध भागातून ताब्यात घेण्यात आले.