Solapaur Stone Labyrinth: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवात आणखी एका सुवर्ण अध्यायाची भर पडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी येथील गवताळ प्रदेशात तब्बल दोन हजार वर्षे जुनी आणि भारतामधील आतापर्यंतची सर्वात मोठी वर्तुळाकार दगडी चक्रव्यूह रचना सापडली आहे. या शोधामुळे प्राचीन भारत आणि रोमन साम्राज्यातील व्यापाराचे ऐतिहासिक धागेदोरे पुन्हा एकदा उजेडात आले आहेत.
वन्यजीव निरीक्षणातून इतिहासाचा शोध
विशेष म्हणजे, हा शोध कोणत्याही उत्खननातून नव्हे, तर निसर्गप्रेमींच्या सतर्कतेमुळे लागला आहे. सोलापूरच्या 'नेचर कन्झर्वेशन सर्कल'ची टीम बोरामणी वनक्षेत्रात दुर्मिळ सोनचिरैया आणि लांडग्यांच्या निरीक्षणासाठी गेली होती. यावेळी पप्पू जमादार, नितीन अन्वेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जमिनीवर दगडांची एक विशिष्ट मांडणी दिसली. त्याचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून त्यांनी तातडीने पुरातत्व अभ्यासकांशी संपर्क साधला.
का खास आहे ही रचना?
पुण्यातील डेक्कन कॉलेजचे पुरातत्व अभ्यासक सचिन पाटील आणि प्रा. पी. डी. साबळे यांनी या स्थळाचा अभ्यास केला असता, काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या.भारतात आतापर्यंत जास्तीत जास्त ११ सर्किट्स असलेली चकव्यूह रचना सापडली होती. मात्र, बोरामणीची ही रचना १५ सर्किटची असून ती ५० फूट बाय ५० फूट व्यासाची आहे. ही रचना लहान दगडी गोट्यांपासून बनलेली आहे. सभोवतालच्या जमिनीपेक्षा ही जागा १ ते १.५ इंच उंच असल्याने गेल्या अनेक शतकांपासून ती मानवी हस्तक्षेपाशिवाय सुरक्षित राहिली आहे.
रोमन साम्राज्याशी थेट कनेक्शन
या शोधाचा सर्वात मोठा पैलू म्हणजे त्याचे रोमन कनेक्शन. ही रचना पहिल्या ते तिसऱ्या शतकातील रोमन नाण्यांवरील चक्रव्यूहाच्या नक्षीशी तंतोतंत जुळते. सातवाहन काळात महाराष्ट्रातील तेर (धाराशिव), कोल्हापूर आणि कराड हा भाग जागतिक व्यापाराचा मोठा मार्ग होता. रोमन व्यापारी या चक्रव्यूह रचनेचा वापर नेव्हिगेशनल मार्कर म्हणून करत असावेत, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्याकाळी भारतातून मसाले आणि रेशीम रोममध्ये जायचे, तर बदल्यात सोन्याची नाणी भारतात येत असत.
सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व
स्थानिक भाषेत याला 'कोडे' म्हटले जाते, तर काही ठिकाणी याला यमद्वार किंवा मनचक्र असेही संबोधले जाते. ही रचना केवळ व्यापारासाठीच नाही, तर ध्यानधारणा, आध्यात्मिक साधना आणि प्रजनन शक्तीचे प्रतीक म्हणूनही वापरली जात असावी, असे अभ्यासक सांगतात.
जागतिक स्तरावर दखल
या ऐतिहासिक शोधाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. लंडनचे प्रसिद्ध चक्रव्यूह संशोधक जेफ सावर्ड यांनी याला अत्यंत दुर्मिळ शोध म्हटले आहे. युकेमधील प्रतिष्ठित कॅरड्रोइया या आंतरराष्ट्रीय जर्नलच्या २०२६ च्या आवृत्तीत या शोधावर सविस्तर लेख प्रसिद्ध केला जाणार आहे.
Web Summary : A 2000-year-old, 50-foot stone labyrinth, linked to Roman trade, was discovered in Solapur. The 15-circuit structure, resembling Roman coin designs, suggests navigational use by traders exchanging spices for gold. It may also hold cultural and spiritual significance.
Web Summary : सोलापुर में 2000 साल पुराना, 50 फुट का पत्थर का चक्रव्यूह खोजा गया, जो रोमन व्यापार से जुड़ा है। 15-सर्किट संरचना, रोमन सिक्का डिजाइनों के समान, व्यापारियों द्वारा मसालों के बदले सोने के व्यापार में नेविगेशनल उपयोग का सुझाव देती है। इसका सांस्कृतिक और आध्यात्मिक महत्व भी हो सकता है।