लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारत हा तरुणांचा देश असून, तरुणांची आर्थिक सुबत्ता वाढवायची असेल त्यांच्यातील कौशल्य पणाला लावावे लागेल. त्यांचे कौशल्य वाढविले तर जगभरात मनुष्यबळ पुरविणारे ‘पॉवर इंजिन’ म्हणून भारताकडे पाहिले जाईल. तरुणांमधील कौशल्य हेरण्याचे काम ‘लोकमत’च्या विविध पुरस्कार सोहळ्यांतून केले जात असून, त्यांना जागतिक व्यासपीठ मिळवून दिले जात असल्याचे गौरवोद्गार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काढले. २०२७ पर्यंत भारत जगातील मोठी तिसरी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल आणि तो दिवसही दूर नाही, असा विश्वासही नार्वेकर यांनी व्यक्त केला.
कफ परेडमधील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये शुक्रवारी ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्डस २०२५’ सोहळा झाला. यावेळी उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह क्रेडाई एमसीएचआय ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता, एसएमई चेंबर ऑफ इंडिया, महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशन आणि एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, पद्मावती पल्प ॲण्ड पेपर मिल्सचे व्यवस्थापकीय संचालक परेश शाह, राजा राणी ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष अभिजित पाटील, लागू बंधूचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप लागू, पिल्लई संस्थांच्या समूहाच्या संचालक आणि हार्टफुलनेस ध्यान प्रशिक्षक डॉ. निवेदिता श्रेयन्स, जेव्हीएम स्पेसचे संचालक मंथन मेहता, अल्फा कार्बनलेस पेपर मॅन्युफॅक्चरिंग कं. प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मण व्ही. कदम, ब्राइट आऊटडोअर मीडियाचे सीएमडी डॉ. योगेश लखानी उपस्थित होते.
लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी, लोकमतचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. विजय शुक्ला यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.राहुल नार्वेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश नवी उंची गाठत आहेत. भारत सध्या जगातील मोठी पाचवी अर्थव्यवस्था आहे.
भारताने ‘यूके’ला मागे टाकले; विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, भारताने ‘यूके’लाही मागे टाकले आहे. २०२७ पर्यंत भारत जगातील मोठी तिसरी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल. आपला विकासदर सहा टक्क्यांवर असून, विकासदर पुढे नेण्यासाठी तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. ‘लोकमत’चे पुरस्कार प्रेरणादायी असतात. तळागाळातील लोक शोधून त्यांना गौरविले जाते, ही उल्लेखनीय बाब आहे. ‘महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर’ पुरस्कार सोहळ्यात लोकोपयोगी, समाजोपयोगी कामांची दखल घेतली जाते. समाजाला दिशा देण्याचे काम करायचे असेल तर ‘लोकमत’सारखे पुरस्कार सोहळे व्हावेत. कारण कॉर्पोरेट्स, उद्योजक किंवा कलावंतांना पुरस्कार दिले जातात.
लोकमत समूहाचा पुरस्कार सोहळा किंवा मॅरेथॉनसारख्या स्पर्धा असोत. ‘लोकमत’ने नेहमीच समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. अत्याधुनिक टेक्नॉलॉजी ही काय असते? हे लोकमतने मॅरेथॉनच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला दाखवून दिले आहे. उदय सामंत, उद्योगमंत्री
लोकमतच्या विविध पुरस्कार सोहळ्यांत समाजकारण, राजकारण, अर्थकारण, उद्योग, क्रीडा, साहित्य अशा प्रत्येक क्षेत्रातील कामाची दखल घेतली जाते. मी आमदार असताना माझ्या कामाची दखल घेत मलाही ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरविले होते.प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्यमंत्री