भारत बटालियन-३चा तळ अहमदनगरला
By Admin | Updated: January 21, 2016 03:40 IST2016-01-21T03:40:53+5:302016-01-21T03:40:53+5:30
पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारत राखीव बटालियन-३ चे कोल्हापुरातील तळ (मुख्यालय) आता अहमदनगर जिल्ह्यातील मौजे मिरजगाव येथे स्थलांतरित केले जाणार आहे.

भारत बटालियन-३चा तळ अहमदनगरला
जमीर काझी, मुंबई
पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारत राखीव बटालियन-३ चे कोल्हापुरातील तळ (मुख्यालय) आता अहमदनगर जिल्ह्यातील मौजे मिरजगाव येथे स्थलांतरित केले जाणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न करुनही १०० एकरचा भूखंड न मिळाल्याने पोलीस महासंचालकांनी हा निर्णय घेतला आहे. नव्या मुख्यालयाच्या जागेला मंजुरी मिळण्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागाकडे नुकताच पाठविण्यात आला आहे. यापूर्वी कोल्हापूरातील जागेसाठी केलेले सर्व पत्रव्यवहार रद्द करण्याचे त्यात नमूद केले आहे.
घातपाती कृत्य व नैसर्गिक आपत्तीवेळी नागरिकांना तत्परतेने मदत देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) धर्तीवर भारतीय राखीव बटालियनचे तीन तळ राज्यात बनविण्यात येत आहेत. त्यापैकी एक कोल्हापूरात होणार होता, मात्र लोकप्रतिनिधींची अनास्था व प्रशासनाच्या दुर्लक्षामुुळे त्यासाठी आवश्यक १०० एकर जागा आजतागायत मिळू शकलेली नाही. त्यासाठी सुरुवातीला कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील मजले गावातील भूखंड निश्चित करण्यात आला होता. मात्र तो ५५ एकर असल्याने त्याला मंजुरी देण्यात आली नाही. त्यानंतर या तालुक्यातील रेंदाळ व करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली येथील विस्तीर्ण जागेबाबत चाचपणी करण्यात आली. मात्र स्थानिक नागरिकांनी त्याला तीव्र विरोध केल्याने ते प्रस्ताव रद्द करण्यात आले. त्यामुळे हा तळ अखेर अहमदनगरमधील मिरजगाव येथे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पोलीस मुख्यालयातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. नाशिक विभागीय आयुक्तालयाने त्यासाठी जागा उपलब्ध असल्याचा प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही वेगाने होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘२६/११’नंतर राज्य सरकारने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने औरंगाबाद, गोंदिया व कोल्हापुरात भारतीय राखीव बटालियन स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी औरंगाबाद येथील बटालियनला जागा मिळाली आहे. गोंदिया व कोल्हापूरातील जागेचे घोंगडे भिजत पडले आहे. प्रत्येक बटालियनमध्ये सुमारे ७५० जवानांसह एकूण एक हजार मनुष्यबळ असणार आहे. त्यांना अद्यावत प्रशिक्षण व शस्त्रे दिली जातील. तिन्ही बटालियनसाठी गेल्यावर्षी भरतीची प्रक्रिया पार पडली आहे. कोल्हापूर बटालियनसाठी निवडण्यात आलेले जवान सध्या दौंडमध्ये आहेत.