स्वतंत्र विदर्भावरून महायुतीत तू तू-मै मै
By Admin | Updated: May 29, 2015 01:13 IST2015-05-29T01:13:44+5:302015-05-29T01:13:44+5:30
स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीच्या मुद्द्यावरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घूमजाव केल्याने शिवसेनेने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान केले.
स्वतंत्र विदर्भावरून महायुतीत तू तू-मै मै
मुंबई : स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीच्या मुद्द्यावरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घूमजाव केल्याने शिवसेनेने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान केले. त्याचवेळी केंद्रातील भाजपा सरकारकडे बहुमत असल्याने लागलीच स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करून टाकवी, अशी मागणी करून रिपाइंचे रामदास आठवले यांनी या वादावर आणखी तेल ओतले.
मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत शहा यांना स्वतंत्र विदर्भाबाबत विचारले असता त्यांनी असे कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे सांगितले. शहा यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांची चांगलीच पंचाईत झाली. शहांचे वक्तव्य प्रसिद्ध होताच गडकरींनी थोडी सारवासारव करत शहांच्या विधानाचा विपर्यास केला गेला, असे सांगितले. तर केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले की, सेनेचा विरोध असल्यामुळे आम्ही ही मागणी पुढे रेटणार नाही.
दुसरीकडे शहा यांच्या भूमिकेचे शिवसेनेने स्वागत केले. गडकरी, फडणवीस व मुनगंटीवार वगैरे नेते निवडणूक प्रचारात वेगळ््या विदर्भाचा मुद्दा मांडत होते. केंद्रात व राज्यात सत्तेवर आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करणार असे बोलत होते. पण भाजपाची अशी कोणतीही भूमिका नाही, अशी अमितवाणी झाल्याने तो प्रश्न निकाली निघाल़्याचे शिवसेनेने म्हटले आहे. रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी वादात उडी घेतल्याने स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्याची हीच योग्य संधी असल्याचे मत व्यक्त केले आहे. (विशेष प्रतिनिधी)