खासगी व अभिमतची स्वतंत्र गुणवत्ता यादी
By Admin | Updated: August 24, 2016 05:29 IST2016-08-24T05:29:28+5:302016-08-24T05:29:28+5:30
खासगी व अभिमत विद्यापीठांशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार

खासगी व अभिमतची स्वतंत्र गुणवत्ता यादी
पुणे : राज्य सामाईक प्रवेश चाचणी कक्षाकडून खासगी व अभिमत विद्यापीठांशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
‘नीट’ परीक्षेतील गुणांच्या आधारे खासगी व अभिमत विद्यापीठांतील एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेश दिले जाणार आहेत. याबाबत कक्षाकडून खासगी व अभिमतसाठी स्वतंत्रपणे परिपत्रक काढले. मात्र या दोन्ही परिपत्रकांमुळे विद्यार्थी-पालक व संस्थांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही संस्थांसाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र लिंक देऊन स्वतंत्र माहिती भरण्यास सांगितली आहे. असे असले तरी स्वतंत्र गुणवत्ता यादीद्वारे प्रवेश होणार की एकच यादी लागणार, याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आले नव्हते. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता.
>‘अभिमत’बाबत
अद्याप अस्पष्टता
अभिमत संस्थामध्ये प्रवेशासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असली तरी त्याबाबत अजूनही अस्पष्टता आहे. अभिमत विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया राज्य शासनाकडून राबविण्यास आमचा विरोध नाही. विद्यापीठांमध्ये संपूर्ण देशभरातील विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे गुणवÞत्ता यादी जाहीर करताना ती देशपातळीवरील असेल की राज्यापुरती मर्यादीत असेल, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. अभिमत विद्यापीठांचे शुल्क हे संंबंधित समितीकडून मान्य करून घेण्यात आलेले असते. अभिमत विद्यापीठांच्या विनाअनुदानित महाविद्यालयांना आरक्षणाचा नियम लागू होत नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया राबविताना यांसह सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. याबाबत राज्य शासनाकडून काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.
- डॉ. विवेक सावजी, प्राचार्य,
भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय