स्वातंत्र्यसेनानी शांती पटेल यांचे निधन
By Admin | Updated: June 14, 2014 04:47 IST2014-06-14T04:29:13+5:302014-06-14T04:47:10+5:30
थोर स्वातंत्र्यसेनानी, ज्येष्ठ कामगार नेते आणि समाजवादी विचारसरणीचे गांधीवादी नेते डॉ. शांती पटेल यांचे शुक्रवारी पहाटे ५ वाजता माहीम येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले

स्वातंत्र्यसेनानी शांती पटेल यांचे निधन
मुंबई : थोर स्वातंत्र्यसेनानी, ज्येष्ठ कामगार नेते आणि समाजवादी विचारसरणीचे गांधीवादी नेते डॉ. शांती पटेल यांचे शुक्रवारी पहाटे ५ वाजता माहीम येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ९२ होते. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. यतीन पटेल, स्नुषा श्रुती पटेल, नात स्वरा पटेल व मुली मीनल मोदी आणि मृदुला पटेल असे कुटुंबीय आहे.
डॉ. शांती पटेल यांचा जन्म ८ आॅगस्ट १९२२ रोजी गुजरातमधील वीरपूर (बिरपूर) या गावी झाला. वयाची पहिली १५ वर्षे त्यांनी आपल्या मूळ गावीच व्यतीत केली. पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण त्यांनी मातृभाषेतच जन्मगावी घेतले. त्यानंतर, पाचवीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी भाषेत तर सहावी आणि सातवीपर्यंतचे शिक्षण अहमदाबाद येथे घेतले. त्यानंतर, वैद्यकीय शिक्षण वडोदरा येथे घेतल्यानंतर एमबीबीएसच्या पदवीसाठी ते मुंबईत दाखल झाले आणि जे.जे. रुग्णालयातील सरकार मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातून १९५२ साली त्यांनी एमबीबीएसची पदवी संपादन केली. दरम्यानच्या काळात पटेल यांचे शिक्षण सुरू असतानाच ८ आॅगस्ट रोजी महात्मा गांधी यांनी ब्रिटिश साम्राज्याविरोधात ‘छोडो भारत’ आणि ‘करा किंवा मरा’ असा नारा दिला. गांधीवादी विचारांनी भारावून गेलेल्या पटेल यांनी याच वेळी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली आणि ब्रिटिश साम्राज्याविरोधात लढा उभारला.
आणि त्यांनी समाजातील कामगार वर्गासह वंचित घटकांसाठी आपला लढा सुरूच ठेवला. १९४४ सालापासून कामगार चळवळीत हिरिरीने काम करणारे पटेल तब्बल ७०हून अधिक संघटनांमध्ये कार्यरत होते.