इंदापूरचे १८०० शेतकरी अनुदानापासून वंचित
By Admin | Updated: July 4, 2016 01:40 IST2016-07-04T01:40:20+5:302016-07-04T01:40:20+5:30
सन २०१३-१४ व २०१४-१५मध्ये इंदापूर तालुक्यातील ५८०० शेतकऱ्यांचे ठिबक सिंचनाच्या अनुदानासाठी प्रस्ताव देण्यात आले होते.

इंदापूरचे १८०० शेतकरी अनुदानापासून वंचित
लासुर्णे : सन २०१३-१४ व २०१४-१५मध्ये इंदापूर तालुक्यातील ५८०० शेतकऱ्यांचे ठिबक सिंचनाच्या अनुदानासाठी प्रस्ताव देण्यात आले होते. यापैकी कृषी विभागाने शासनाच्या दिलेल्या अपुऱ्या निधीमुळे तालुक्यातील फक्त ४००० प्रस्ताव मंजूर केले. त्यामुळे तालुक्यातील १८०० शेतकरी अजूनही ठिबक सिंचनाच्या अनुदानापासून वंचित राहिल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर आहे.
सध्या सर्वत्रच दुष्काळाचे सावट असल्याने ‘पाणी वाचवा ठिबक सिंचनाचा वापर करा’ अशी घोषणा शासन करत आहे. परंतु इंदापूर तालुक्यात शासनाने पाठविलेला निधी कमी पडल्यामुळे १८०० शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिल्याचे ‘लोकमत’ पाहणीत समोर आले आहे. इंदापूर तालुक्यातील सन २०१३-१४मध्ये ४२०० शेतकऱ्यांनी प्रस्ताव दिले होते. यापैकी ३००० प्रस्ताव मंजूर करण्यात आले. सन २०१४-१५मध्ये १६०० शेतकऱ्यांनी प्रस्ताव दिले होते. यापैकी १००० प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते.
सध्या १८०० शेतकरी ठिबक सिंचनाच्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत. मागेल त्याला शेततळे व मागेल त्याला ठिबक सिंचन अनुदान अशा घोषणा करून शासन शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
मागेल त्याला शेततळे व मागेल त्याला ठिबक सिंचन अनुदान अशा घोषणा करून शासन शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कारण शासन २५ बाय ३० फूट जागेच्या शेततळ्यासाठी ५० हजार रुपये अनुदान देते. परंतु, यासाठी जमीन जर कडक लागली तर एक लाखापर्यंत खर्च येतो. तसेच, ठिबक सिंचनासाठी एकरी पस्तीस ते चाळीस हजार रु. खर्च येतो. परंतु, शासन सतरा ते अठरा हजारच अनुदान देते. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासनाच्या सवलतीचा फायदा घेता येत नसल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)