खामगाव बाजार समिती संचालकांवर अनियमिततेचा ठपका
By Admin | Updated: January 6, 2016 02:03 IST2016-01-06T02:03:27+5:302016-01-06T02:03:27+5:30
१८ जणांवर प्रत्येकी ३.५ लाखांची जबाबदारी निश्चित.

खामगाव बाजार समिती संचालकांवर अनियमिततेचा ठपका
बळीराम वानखडे/ खामगाव (बुलडाणा) : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लाखो रूपयांच्या अनियमिततेची चौकशी पूर्ण झाली असून, समितीतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे १८ संचालक, तसेच सचिवांवर प्रत्येकी सुमारे ३.५ लाख याप्रमाणे जवळपास ६६ लाख रूपयांची जबाबदारी सहाय्यक निबंधकांनी निश्चित केली आहे. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनागोंदी कारभाराबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते नंदु भट्टड यांनी १ जुलै २0१४ मध्ये तक्रार केली होती. तक्रारीची चौकशी विशेष लेखा परीक्षक दीपक जाधव यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांनी नऊ मुद्यांवरील चौकशी अहवाल १४ डिसेंबर २0१४ रोजी बुलडाणा जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केला होता. त्यापैकी सहा मुद्यांवर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे, तसेच कारवाई करण्याचे आदेश कृषी उत्पन्न बाजार समितीला, तर उर्वरित तीन मुद्यांवर चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश सहाय्यक निबंधक एम. ए. कृपलानी यांना जिल्हा उपनिबंधकांनी दिले होते. त्यानुसार व्यापारी वर्गाचा थकीत सेस, जनता बँकेतील गुंतवणूक, तसेच बाजार समितीने टॅक्सी आणि बियरबारवर केलेल्या खर्चाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सहायक निबंधकांनी चौकशी केली. चौकशीअंती अनियमिततेसाठी त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांसह सर्व १८ संचालक आणि तत्कालीन सचिवांवरही जबाबदारी निश्चित केली. सहाय्यक निबंधकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे चौकशी अहवाल सादर केला असून, ही रक्कम समितीच्या संचालकांकडून वसूल करावी की कसे, हा निर्णय आता त्यांच्या स्तरावर घेतला जाईल.