वैद्यकीय प्रवेशासाठी चुरस वाढणार
By Admin | Updated: June 11, 2016 04:15 IST2016-06-11T04:15:01+5:302016-06-11T04:15:01+5:30
राज्यातील शासकीय महाविद्यालयांतील एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस रंगणार आहे

वैद्यकीय प्रवेशासाठी चुरस वाढणार
मुंबई : राज्यातील शासकीय महाविद्यालयांतील एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस रंगणार आहे. खासगी आणि अभिमत महाविद्यालयांतील प्रवेश यंदापासून नीट परीक्षेद्वारे होणार असल्याने शासकीय महाविद्यालयांतील कट आॅफ भलताच वाढणार असल्याची चर्चा आहे. गेल्यावर्षी लागलेल्या कट आॅफमध्ये एमबीबीएस प्रवेशासाठी केईएम आणि बीडीएससाठी सेंट जॉर्ज महाविद्यालयाची कट आॅफ सर्वाधिक गुणांवर स्थिरावली होती.
एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या नजरा मुंबईतील केईएम, नायर, जेजे आणि सायन रुग्णालयांवर असतात. यावर्षी राज्यातील शासकीय महाविद्यालयांत आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केवळ २ हजार ८१० जागा उपलब्ध आहेत. याउलट प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४६ हजार ७९७ इतकी आहे. परिणामी उपलब्ध जागांसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे एका जागेसाठी सुमारे १७ विद्यार्थी इतके आहे. मुंबईत केईएम आणि जेजे यांचा नावलौकिक अधिक असला, तरी नायर आणि सेंट जॉर्ज या महाविद्यालयांची गुणवत्ता यादी सर्वाधिक गुणांवर स्थिरावली होती. त्यामुळे यंदाही येथील जागांसाठी चुरस असेल, यात शंका नाही.
मुंबईसह पुण्यातील बीजेएमसी महाविद्यालयालाही विद्यार्थ्यांची अधिक पसंती मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षी २०० गुण मिळालेल्या एकमेव विद्यार्थ्याने पुण्यातील बीजेएमसी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. बीजेएमसीची गुणवत्ता यादी १८० गुणांवर स्थिरावली होती, तर गुणवत्ता यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या विद्यार्थ्याने मुंबईतील केईएम महाविद्यालयाला पसंती दर्शवली होती. त्याला १९९ गुण होते.
>खासगीची वाट बिकट!
याआधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश मिळाला नाही, तर विद्यार्थ्यांसमोर खासगी महाविद्यालयांचा पर्याय होता. मात्र यावर्षी सीईटीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशासाठी नीटचा खडतर प्रवास करावा लागणार आहे.
त्यामुळे खासगी वैद्यकीय महाविद्यालयांऐवजी त्यांचा पर्याय यंदा आयर्वेद, होमिआपॅथिक अभ्यासक्रमांना मिळू शकते. म्हणून यंदा आयुर्वेद आणि होमिओपॅथिक अभ्यासक्रमांची कट आॅफ वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
...म्हणून चुरस रंगणार
गेल्यावर्षी उपलब्ध जागांसाठी केवळ ३९ हजार ३२८ विद्यार्थी पात्र ठरले होते. मात्र यंदा पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येत ७ हजार ४६९ची वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्के अधिक विद्यार्थी पात्र ठरले आहेत. परिणामी ४६ हजार ७९७ विद्यार्थ्यांत प्रवेशासाठी ‘कांटे की टक्कर’ होईल, यात शंकाच नाही.