समाजाच्या मापदंडामुळेच स्त्रियांवरील अत्याचार वाढलेत
By Admin | Updated: July 31, 2014 01:07 IST2014-07-31T01:07:16+5:302014-07-31T01:07:16+5:30
पुरातन काळापासून समाजाने स्त्रियांसाठी अन् पुरुषांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मापदंड लावलेले आहेत. हे मापदंड स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वाला तडा देतात. या मापदंडामुळेच समाजात स्त्रियांवरील अत्याचार

समाजाच्या मापदंडामुळेच स्त्रियांवरील अत्याचार वाढलेत
मान्यवरांचे प्रतिपादन : ‘पुरुषी नैतिकता : स्त्री अत्याचाराचे खरे कारण’ परिसंवाद
नागपूर : पुरातन काळापासून समाजाने स्त्रियांसाठी अन् पुरुषांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मापदंड लावलेले आहेत. हे मापदंड स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वाला तडा देतात. या मापदंडामुळेच समाजात स्त्रियांवरील अत्याचार वाढले आहेत, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी आज येथे केले.
विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि आकांक्षा प्रकाशन नागपूरच्यावतीने शंकरनगर चौकातील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात ‘पुरुषी नैतिकता : स्त्री अत्याचाराचे खरे कारण’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी स्त्री शक्तीच्या विभाग अध्यक्ष अरुणा सबाने होत्या.
परिसंवादात डॉ. कुमार शास्त्री, डॉ. शैलेंद्र लेंडे, डॉ. मनिषा कोठेकर सहभागी झाल्या होत्या. डॉ. मनिषा कोठेकर म्हणाल्या, नैतिक मूल्य शाश्वत आहेत. समाजाच्या मापदंडामुळे अनेकदा कनिष्ठ असलेली स्त्री अत्याचाराला बळी पडते. पुरुष-स्त्रीकडे पाहण्याची भेदभावाची दृष्टी अत्याचाराला जन्म देते. जन्मच नाकारणे ही स्त्रियांवरील अत्याचाराची सुरुवात आहे. पुरुषापेक्षा कनिष्ठ असलेल्या स्त्रीने आपल्यापोटी जन्म घेऊ नये, असे सर्वांनाच वाटते. त्यातूनच स्त्री भ्रूणहत्या वाढली. मुलापेक्षा मुलीला कमी खायला देऊन त्यांना कुपोषित करणे, कामाचा बोजा, अकाली विवाह, मातृत्व, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, मृत्यू हे स्त्रियांवरील अत्याचाराचे विविध प्रकार त्यांनी सांगितले.
स्त्रियांवरील अत्याचारामुळे आपण पुरुषांपेक्षा कनिष्ठ असल्याची स्त्रियांची मानसिकता बनली असल्याचे त्या म्हणाल्या. डॉ. शैलेंद्र लेंडे म्हणाले, सार्वजनिक आणि खाजगी असे स्त्री अत्याचाराचे क्षेत्र आहेत.
दलित, आदिवासी महिलांवरील अत्याचार, वैयक्तिक, खाजगी, राजकीय स्वार्थ, धार्मिक, सांस्कृतिक कारणातून स्त्री अत्याचार घडतात. यामागे पुरुषी सत्तेचा दृष्टिकोन कारणीभूत आहे. दलितालाही आपली पत्नी कनिष्ठ वाटते. अन्याय होणाऱ्या स्त्रीला आपल्यावर अन्याय होत नाही असे वाटण्याचे कारणही पुरुषी वृत्तीच असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. कुमार शास्त्री यांनी स्त्री अत्याचारात मानसिकता महत्त्वाची असल्याचे सांगून स्त्रीने गुलामगिरीची मानसिकता का स्वीकारली याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
डॉ. अरुणा सबाने यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. संचालन सुजाता लोखंडे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले. परिसंवादाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)