प्रचाराकडे मजुरांचा वाढता कल
By Admin | Updated: October 10, 2014 00:58 IST2014-10-10T00:58:05+5:302014-10-10T00:58:05+5:30
हमखास चांगली कमाई होत असल्याने नाका कामगारांचा कल निवडणूक प्रचाराकडे वाढला आहे. याचा परिणाम मात्र नाका ओस पडून मजुरांचा तुटवडा निर्माण होण्यात झाला आहे

प्रचाराकडे मजुरांचा वाढता कल
चिकणघर : हमखास चांगली कमाई होत असल्याने नाका कामगारांचा कल निवडणूक प्रचाराकडे वाढला आहे. याचा परिणाम मात्र नाका ओस पडून मजुरांचा तुटवडा निर्माण होण्यात झाला आहे. यामुळे कल्याणात किरकोळ कामांसाठीही मजूर मिळेनासे झाले आहेत.
सध्या नाक्यावर पुरुष मजुराला ४५० तर स्त्री मजुरास ३५० रु. प्रतिदिन रोजगाराचे दर आहेत. मात्र, हा रोजगार सलग नसतो. परंतु, निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून संपेपर्यंत प्रचार आणि सभांसाठी पुरुषाला ३०० तर स्त्री मजुरास २०० रुपये तासाला मिळतात. हा रोजगार किमान १०-१२ दिवस सलग असतो. याशिवाय चहा, नाश्ता, जेवण, टोप्या मिळतात. प्रचार रॅलीला आणि नेत्यांच्या सभांना तीन ते चार तास सहज लागतात. तासावरचा रोजगार मजुरांच्या पथ्यावरच पडत असल्याने मजुरांचे निवडणूक प्रचाराला आकर्षण वाढले आहे. सर्वच पक्ष स्वबळावर ही निवडणूक लढवत असल्याने प्रचार रॅली किंवा सभांसाठी गर्दीची आवश्यकता असतेच. यासाठी मजुरांशिवाय पर्याय राहिलेला नाही.
संगणकाचे ज्ञान असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांनाही आपापल्या क्षमतेनुसार निवडणूक प्रचारात रोजगार उपलब्ध झाला आहे. प्रचारात सोशल नेटवर्किंगचा प्रभाव वाढल्याने संगणकतज्ज्ञांना मागणीही वाढली आहे. रिक्षावाल्यांनाही प्रतिदिन एक हजार मिळत आहेत. तीच माणसे, त्याच रिक्षा, त्याच पक्षनिहाय घोषणा, मात्र टोप्या आणि झेंडे वेगवेगळे असल्याचे चित्र कल्याणमध्ये तरी दिसत आहे.
परिणामी, कल्याणातील शिवाजी चौक आणि खडकपाडा येथील दोन्ही मजुरांचे नाके ओस पडल्याचे बघायला मिळत आहे. (वार्ताहर)