धोकादायक ठिकाणी गस्त वाढणार
By Admin | Updated: December 17, 2014 09:48 IST2014-12-17T03:15:44+5:302014-12-17T09:48:38+5:30
रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत ‘लोकमत’ने केलेल्या मेगा स्टिंग आॅपरेशनचा आज दिवसभर शहरात बोलबाला होता.

धोकादायक ठिकाणी गस्त वाढणार
लोकमतच्या स्टिंग ऑपरेशनची दखल:
वाहतूक, रेल्वे, पोलीस महिला सुरक्षेविषयी गंभीर
टीम लोकमत, मुंबई
रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत ‘लोकमत’ने केलेल्या मेगा स्टिंग आॅपरेशनचा आज दिवसभर शहरात बोलबाला होता. समाजाच्या प्रत्येक स्तरात हे स्टिंग आॅपरेशन वाचले गेले आणि त्यावर प्रतिक्रियाही उमटल्या. विशेष म्हणजे या स्टिंगमधून पुढे आलेले भीषण वास्तव मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागातल्या संवेदनशील अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले. येत्या काळात महिला सुरक्षेच्या उपाययोजना अधिक सतर्कतेने करण्याची ग्वाहीही दिली.
वाहतूक विभागाचे सहआयुक्त बी.के. उपाध्याय, परिवहन आयुक्त महेश झगडे, रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, मुंबई पोलीस दलाचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी, मुंबई आॅटोरिक्षा मेन्स युनियनचे सहायक सरचिटणीस शशांक राव आणि अशा अनेक संवेदनशील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य मुंबईकरांनी ‘लोकमत’च्या मेगा स्टिंग आॅपरेशनची दखल घेतली. मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या व गंभीर विषयाला ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून हात घातला. या स्टिंगमध्ये सहभागी झालेल्या टीम ‘लोकमत’चे धाडस वाखाणण्याजोगे आहे, अशी प्रतिक्रिया परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, गुन्हा घडल्यानंतर पोस्टमॉर्टेम करण्याऐवजी गुन्हा घडूच नये, यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे, तीच जनजागृती ‘लोकमत’ने केली आहे. तुम्ही वास्तव मांडले, अशी प्रतिक्रिया वाहतूक विभागाचे सहआयुक्त बी.के. उपाध्याय यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘लोकमत’च्या स्टिंगमधून असुरक्षित, धोकादायक म्हणून अधोरेखित झालेल्या निर्जन मार्गांवर अधिक गस्त, पोलिसांची उपस्थिती वाढविली जाईल. रात्री धावणाऱ्या रिक्षा-टॅक्सी किंवा खासगी वाहनांमधील महिलांचा प्रवास सुरक्षित कसा होईल, यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येईल.
स्टिंगमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनसवर पोलीस दिसलेच नव्हते. त्याबाबत रेल्वे पोलीस आयुक्त सिंगल म्हणाले, टर्मिनसवर पोलीस उपस्थित का नव्हते याची चौकशी केली जाईल. संबंधित विभागाला तशा सूचना केल्या जातील. रात्री-अपरात्री टर्मिनसवर येणाऱ्या, जाणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणखी कोणते उपाय योजता येतील, याचा विचार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनसाठी जी ठिकाणे, मार्ग निवडले त्यावर अनधिकृत रिक्षांचा प्रचंड सुळसुळाट आहे. अशा अवैध रिक्षा व चालक-मालकांची तक्रार युनियनच्या माध्यमातून संबंधित यंत्रणांना आधीच करण्यात आलेली आहे. ‘लोकमत’च्या स्टिंगमधून या तक्रारींना दुजोराच मिळाला. भविष्यात या मार्गांवर गुन्हा घडू नये, यासाठी शहर व वाहतूक पोलिसांनी उपाय योजणे आवश्यक असल्याचे मुंबई आॅटोमेन्सचे शशांक राव यांनी सांगितले. दरम्यान, ‘लोकमत’चे स्टिंग आॅपरेशन प्रसिद्ध झाल्यानंतर सकाळपासून कार्यालयातील दूरध्वनी, संबंधित प्रतिनिधींचे मोबाइल फोन खणखणू लागले. काहींनी शुभेच्छा दिल्या; तर काहींनी काळजी व्यक्त केली. सर्वच शासकीय-खासगी आस्थापना, कॉर्पोरेट कार्यालयांसह घराघरांत आज ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनवर चर्चा घडल्या. (प्रतिनिधी)