हिंगोलीत रावण दहनासाठी प्रेक्षकांची वाढती गर्दी
By Admin | Updated: October 11, 2016 18:26 IST2016-10-11T18:26:27+5:302016-10-11T18:26:27+5:30
येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाची १६२ वर्षांची परंपरा असून मंगळवारी ग्रामीण भागातील लोकांची दुपारीच प्रदर्शनीत गर्दी होती. तर सायंकाळच्या सुमारास रावण दहन

हिंगोलीत रावण दहनासाठी प्रेक्षकांची वाढती गर्दी
ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 11 - येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाची १६२ वर्षांची परंपरा असून मंगळवारी ग्रामीण भागातील लोकांची दुपारीच प्रदर्शनीत गर्दी होती. तर सायंकाळच्या सुमारास रावण दहन पाहण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी होताना दिसत होती.
हिंगोलीतील ऐतिहासिक दसरा महोत्सवासोबतच येथील प्रदर्शनी शहरी व ग्रामीण भागातील जनतेसाठी आकर्षण असते. दररोज गावोगावातून नागरिक जणू यात्रा उत्सवाप्रमाणे या प्रदर्शनीत भेट देण्यासाठी येत असतात. दसऱ्याच्या मुहुर्तावर तर बाजारपेठेत खरेदीसह प्रदर्शनीतही भेट दिली जाते. त्यामुळे दुपारपासूनच प्रदर्शनीत पाय ठेवायलाही जागा नसल्याचे चित्र होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंतही असेच चित्र होते. त्यानंतर काहीकाळ गर्दी थोडी कमी झाली की, पुन्हा लोंढेच्या लोंढे दाखल होत होते. त्यातही प्रदर्शनीचा आनंद घेतल्यानंतर रावण दहनाला हजेरी लावण्याच्या उद्देशाने येणाऱ्यांची संख्या मोठी होती. जिल्ह्यातीलच नव्हे, तर परजिल्ह्यातील मंडळीही यात मोठ्या संख्येने होती. आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये येथील रावण दहनानिमित्त होणारी आतषबाजी आकर्षणाचा विषय असते. यंदा ११.४५ चा रावण दहनाचा मुहुर्त असल्याने जिल्ह्यातील मंडळी मात्र उशिराने दाखल होईल, असे दिसते.
कोट्यवधींची उलाढाल
हिंगोली येथील दसरा महोत्सवातील प्रदर्शनी आणखी दोन ते तीन दिवस चालणार आहे. मात्र मागील काही दिवसांत कोट्यवधीची उलाढाल झाली. त्यातही सलग सुट्यांमुळे प्रदर्शनीत मोठी गर्दी होत असून यंदा प्रदर्शनीतील व्यावसायिकांची चांदी झाली आहे. झोके, चक्री, मौत का कुंंआ, पन्नालाल शो, लहान मुलांचे पाळणे व इलेक्टॉनिक झुले, महिलांची आभूषणे, खेळणी, खाद्यपदार्थ, कोल्ड्रिंक्स आदींच्या दुकानांवर यंदा मोठी गर्दी दिसून येत आहे.