अवयवदानाबद्दल वाढतेय जागृती!
By Admin | Updated: March 27, 2015 02:02 IST2015-03-27T02:02:23+5:302015-03-27T02:02:23+5:30
मृत्यूपश्चात अवयवदान केल्याने गरजू व्यक्तीला जीवनदान मिळू शकते, हा विचार आता चांगलाच रुजू लागला आहे.

अवयवदानाबद्दल वाढतेय जागृती!
देणाऱ्याचे हात वाढले : माहितीसाठी दहा हजार वेळा खणखणली हेल्पलाइन
पूजा दामले - मुंबई
मृत्यूपश्चात अवयवदान केल्याने गरजू व्यक्तीला जीवनदान मिळू शकते, हा विचार आता चांगलाच रुजू लागला आहे. म्हणूनच अवयवदानासंबंधी माहिती तसेच मदतीसाठी अवयवदान हेल्पलाइन दोन वर्षांत तब्बल १० हजार वेळा खणखणली आहे.
दोन वर्षांपासून मोहन फाउंडेशनतर्फे देश पातळीवर अवयवदानाविषयी मोफत हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून सध्या मराठीसह सात भाषांमध्ये माहिती देण्यात येते. गेल्या महिन्यात नागपूर येथे सेंटर सुरू करण्यात आले आहे. हेल्पलाइनवर येणारे ५० टक्के कॉल्स हे अवयवदानाची प्रक्रिया जाणून घेण्यासंबंधीचे असतात. अवयवदान म्हणजे नक्की काय? कोणाला अवयवदान करता येते? कोणत्या अवयवांचे दान शक्य असते? नातेवाइकाला किडनी हवी आहे, कुठे मिळेल? असे अनेक प्रश्न सामान्यपणे विचारले जातात.
हेल्पलाइनवर येणारे ५० टक्के कॉल्स रुग्णांच्या नातेवाइकांचे असतात. वृद्धांच्या बरोबरीनेच तरुणांचा समावेशही त्यात असतो. केवळ मृत्यूनंतरच अवयवदान करता येते का, असा प्रश्नही
विचारला जातो. या वेळी अवयवदानाची संपूर्ण प्रक्रिया त्यांना समजावून सांगितली जात असल्याचे नागपूर केंद्राचे प्रमुख डॉ. रवी वानखेडे यांनी सांगितले.