चारही आरोपींच्या कोठडीत वाढ
By Admin | Updated: May 18, 2016 05:18 IST2016-05-18T05:18:56+5:302016-05-18T05:18:56+5:30
शीना बोरा हत्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने मंगळवारी चारही आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ६ जूनपर्यंत वाढ केली

चारही आरोपींच्या कोठडीत वाढ
मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने मंगळवारी चारही आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ६ जूनपर्यंत वाढ केली, तर श्यामवर राय याच्या ‘माफीचा साक्षीदार’ होण्याच्या अर्जावर उत्तर देण्यासाठी विशेष न्यायालयाने सीबीआयला ६ जूनपर्यंत मुदतवाढ दिली.
गेल्याच आठवड्यात शीना बोरा हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर श्यामवर राय याने ‘माफीचा साक्षीदार’ करण्यात यावे, यासाठी न्यायालयात अर्ज केला
आहे. या अर्जावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सीबीआयने मंगळवारच्या सुनावणीत विशेष न्यायालयाकडून मुदत मागितली. त्यावर विशेष न्यायालयाने सीबीआयला ६ जूनपर्यंत मुदत दिली, तर इंद्राणी मुखर्जी, श्यामवर राय, संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी यांच्या न्यायालयीन कोठडीत ६ जूनपर्यंत वाढ केली.
राय याने गेल्या आठवड्यात न्यायालयाला दोन पानी पत्र लिहिले. या पत्रात त्याने शीना बोरा हत्याप्रकरणाची संपूर्ण माहिती देण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्याऐवजी आपल्याला शिक्षेत दया दाखवण्यात यावी, अशी विनंती त्याने न्यायालयाला केली.
या संदर्भात न्यायालयाने सीबीआयला उत्तर देण्याचे निर्देश
दिले होते. मात्र, सीबीआयने आपल्याला आणखी काही
दिवसांची मुदत मिळावी, अशी
विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने ही विनंती मान्य केल्याने सीबीआयला ६ जूनपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे. (प्रतिनिधी)