गट विमा संरक्षणात वाढ

By Admin | Updated: September 30, 2015 02:40 IST2015-09-30T02:40:34+5:302015-09-30T02:40:34+5:30

राज्य शासकीय कर्मचारी सेवेत असलेल्या गट क व ड कर्मचाऱ्यांच्या विमा संरक्षणात वाढ करण्याचा निर्णय वित्त विभागाने मंगळवारी घेतला.

Increase in group insurance cover | गट विमा संरक्षणात वाढ

गट विमा संरक्षणात वाढ

मुंबई : राज्य शासकीय कर्मचारी सेवेत असलेल्या गट क व ड कर्मचाऱ्यांच्या विमा संरक्षणात वाढ करण्याचा निर्णय वित्त विभागाने मंगळवारी घेतला. ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर सुरू असलेली गट विमा योजना बाजारात उपलब्ध असलेल्या योजनांपेक्षा अधिक लाभदायी व सुटसुटीत आहे. या निर्णयाचा फायदा सुमारे ४लाख ७० हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना सेवेत असताना मृत्यू आल्यास त्याच्या कुटुंबाला मदत व्हावी आणि सेवानिवृत्तीनंतर त्यास मिळावयाच्या उत्पन्नात वाढ म्हणून काही ठोक रक्कम देता यावी या दुहेरी लाभांसाठी सुरु असलेल्या राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजनेत सुधारणा करण्यात आली असून या सुधारणेनुसार गट क च्या कर्मचा-यांना १ लाख २० हजाराऐवजी रु. ३ लाख ६० हजाराचे विमासंरक्षण व गट ड च्या कर्मचाऱ्यांना रु. ६० हजाराऐवजी २ लाख ४० हजाराचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
गट क व ड च्या कर्मचारी संघटनांनी गट विमा योजनेअंतर्गत मासिक वर्गणी व त्या अनुषंगाने विमासंरक्षणात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार गट क यांची विमा वर्गणी दरमहा रु. ३६० व गट ड ची विमा वर्गणी २४० इतकी होईल. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजनेचा वर्धापन दिन दि. १ जानेवारी असल्यामुळे सुधारीत योजना १ जानेवारी, २०१५ पासून लागू होईल. सुधारीत वर्गणीच्या फरकाची रक्कम १ नोव्हेंबर ते ३१ मार्च २०१६ मधील वेतनातून समान हप्त्यात वसुल केली जाईल. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Increase in group insurance cover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.