ठाणे जिल्ह्यात माता-बालक मृत्यूत वाढ
By Admin | Updated: November 3, 2014 03:46 IST2014-11-03T03:46:31+5:302014-11-03T03:46:31+5:30
मातांचे प्रसूतीनंतर होणारे मृत्यू आणि बालमृत्यू ही चिंताजनक बाब असल्याची खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच मुंबईत व्यक्त केली होती

ठाणे जिल्ह्यात माता-बालक मृत्यूत वाढ
ठाणे : मातांचे प्रसूतीनंतर होणारे मृत्यू आणि बालमृत्यू ही चिंताजनक बाब असल्याची खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच मुंबईत व्यक्त केली होती, मात्र ठाणे जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत प्रसूती काळात सुमारे १४ मातांचा आणि ५८ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा अजूनही पुरेशा प्रमाणात पोहोचली नसल्यानेच मृत्यूच्या या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्य शासनाकडून स्तनदा माता आणि नवजात बालकांचे मृत्यू रोखण्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यांत राज्याप्रमाणे विविध योजना राबविल्या जात आहेत. दरम्यान, मागील तीन वर्षांपासून मातामृत्यू व बालमृत्यूचा आलेख जरी उतरता असला तरी एप्रिल ते आॅगस्ट २०१४ या पाच महिन्यांच्या कालावधीत १४ मातांचे आणि शून्य ते एक वयोगटांतील २८ मुले आणि ३० मुली अशा ५८ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे. (प्रतिनिधी)