एसटी बसअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय
By Admin | Updated: May 21, 2016 01:33 IST2016-05-21T01:33:00+5:302016-05-21T01:33:00+5:30
गैरसोय टाळण्यासाठी आगार व्यवस्थापनाने चाकण - शिक्रापूर महामार्गावरून शालेय वेळेत एसटी बस उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली

एसटी बसअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय
शेलपिंपळगाव : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रवासासाठी एसटी बसअभावी होणारी गैरसोय टाळण्यासाठी आगार व्यवस्थापनाने चाकण - शिक्रापूर महामार्गावरून शालेय वेळेत एसटी बस उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. शालेय वेळेत एसटी बस उपलब्ध नसल्याने खेडच्या पूर्व भागातील सुमारे १० ते १२ गावांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचा सर्वाधिक फटका महाविद्यालयीन मुलींना सहन करावा लागत आहे.
बहुळ, शेलपिंपळगाव, सिद्धेगव्हाण, साबळेवाडी, चौफुला, मोहितेवाडी, नवीनगाव, चिंचोशी, दौंडकरवाडी, रामनगर, शेलगाव, कोयाळी-भानोबाची, गोलेगाव, वडगाव-घेनंद, भोसे, काळूस, संगमवाडी, दत्तवाडी, रासे आदी गावांतील बहुसंख्य विद्यार्थी शालेय शिक्षणासाठी चाकण तसेच राजगुरूनगरमध्ये जात आहेत. बहुतांश विद्यार्थी पासधारक असल्याने शाळेत ये -जा करण्यासाठी एसटी बसचाच वापर त्यांना करावा लागत आहे.
राजगुरूनगर, चाकणमधील महाविद्यालये साडेअकराच्या दरम्यान सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा घरी जाण्यासाठी चाकणहून दुपारी बाराच्या दरम्यान एसटी बस उपलब्ध नसल्याने, विद्यार्थ्यांची गैरसोय होते. परिणामी सर्वच विद्यार्थ्यांना बसपास किंवा एसटीपास असूनसुद्धा इतर वाहतुकीचा आसरा घेण्याची वेळ येत आहे. परिणामी वाहतुकीमध्ये विद्यार्थ्यांकडून प्रवासाचे जास्त पैसे आकारले जात असल्याने त्यांना नाहक ‘आर्थिक’ भुर्दंड सहन करून मार्गस्थ व्हावे लागते. चाकण-शिक्रापूर महामार्गावर चाकण आगारातून दुपारी सव्वाबाराच्या दरम्यान नव्याने एसटी बस सुरु करून द्यावी, अशी मागणी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनींकडून केली जात आहे.
।‘‘एसटी बसअभावी प्रवासास आम्हा विद्यार्थिनींची गैरसोय होत असून, धोका पत्करून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. कॉलेज सुटल्यानंतर पुन्हा घरी येण्यासाठी वेळेत एसटी बस उपलब्ध नसल्याने प्रवासाचा प्रश्न समोर उभा राहतो. आमची गरज लक्षात घेऊन आगार व्यवस्थापनाने नवीन शैक्षणिक वर्षात वेळेत बससेवा सुरु करून द्यावी.’’
- महाविद्यालयीन विद्यार्थिनी
>नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याअगोदर सोय व्हावी
शालेय व महाविद्यालयीन मुले रस्त्यावरील अवैध वाहतुकीचा आसरा घेऊन घरी मार्गस्थ होत
असतात. परंतु मुलींना भीतीपोटी नाहक त्रास सहन करून एसटीचीच ताटकळत वाट पाहत उभे राहावे लागते. दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान
चाकण चौकात हे चित्र नित्याचेच बनले आहे.
दरम्यान रोडरोमिओंचा त्रासदेखील विद्यार्थिनींच्या पदरी येतो.
चाकण-शिक्रापूर महामार्गावरून खासगी अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु असते. या वाहतुकीचे बहुतांशी चालक मद्यप्राशन करून वाहतूक करत असतात. शालेय विद्यार्थ्यांना सरकारी वाहन उपलब्ध नसल्याने या अवैध खासगी वाहतुकीचा आसरा घेऊन मार्ग काढावा लागतो. परंतु अशा मद्यपी चालकांमुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून हा प्रवास करावा लागत आहे.