उमेदवारावर आयकर विभागाचाही ‘वॉच’ !
By Admin | Updated: January 22, 2017 01:56 IST2017-01-22T01:56:04+5:302017-01-22T01:56:04+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीत ‘साम, दाम, दंड, भेद’ ही नीती अजमावत विजयी होण्यासाठी आसुसलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी धोक्याचा इशारा आहे. मतदारांना प्रलोभन

उमेदवारावर आयकर विभागाचाही ‘वॉच’ !
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत ‘साम, दाम, दंड, भेद’ ही नीती अजमावत विजयी होण्यासाठी आसुसलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी धोक्याचा इशारा आहे. मतदारांना प्रलोभन दाखविणे त्यांना चांगलेच महागात पडणार असून, विविध माध्यमांतून केली जाणारी जाहिरातबाजी व प्रचारावरील खर्चावर निवडणूक आयोगाबरोबरच आयकर विभागाकडूनही नजर ठेवली जाणार आहे. त्यासाठी १५ आयकर अधिकाऱ्यांच्या पथकाचे उमेदवारांच्या दैनंदिन व्यवहारांवर लक्ष असेल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. निवडणूक काळात मद्य व वस्तू वाटपाबरोबरच उमेदवारांच्या बँक व हवालामार्फत होणाऱ्या व्यवहारांवर तटरक्षक दल, रेल्वे व हवाईमार्गे नजर ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले आहे.
सहारिया यांनी महापालिकेला दुपारी भेट देऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. या वेळेस पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती, निवडणूक आयोगाचे सचिव चंद्रशेखर चन्ने, पालिका आयुक्त अजय मेहता आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
यावर असेल नजर
उमेदवारांना जाहिरात व प्रचारावर पाच लाखापर्यंतची मर्यादा असून, प्रत्येक दिवसाच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी आयकर अधिकारी तैनात असतील.
उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र वृत्तपत्रातून जाहीर केले जाणार असून, मतदान केंद्राबाहेरही त्याच्या प्रती जनतेच्या माहितीसाठी लावण्यात येणार आहे.
सत्ताधारी पक्षासही सवलत नाही
सत्ताधारी पक्षासह कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांना कसल्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. दारू, पैसे वाटप होणार नाही, परराज्यातून मद्य आयात होणार नाही, हवालामार्फत, खासगी हेलिकॉप्टर, चार्टर्ड प्लेनद्वारे मद्य, पैसे आणले जाणार नाहीत, याकडे लक्ष असेल.
वनक्षेत्र, खारफुटी अशा ठिकाणी दारूवाटप होतेय का, याकडे तटरक्षक दल व पोलिसांमार्फत, रेल्वे व हवाईमार्गे लक्ष ठेवले जाईल, बँकेमधून मोठ्या प्रमाणात रक्कम काढण्यात येत आहे का, यासाठी बँक व आयकर खात्याची मदत घेऊन माहिती घेण्यात येणार आहे.
पालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांची निवडणूक नियंत्रण समिती कार्यरत असणार आहे. १४ निरीक्षक नजर ठेवून असणार आहेत.
तीन दिवस ड्राय डे
२१ फेब्रुवारी रोजी मतदान असल्याने त्या दिवशी, तसेच २० फेब्रुवारी व निकालादिवशी म्हणजेच २३ फेब्रुवारीला दारू विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
३५ हजारांपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी, अधिकारी तैनात असतील.
आॅनलाइन पद्धतीने उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सोशल मीडियावर वॉच ठेवण्यासाठी वेगळे पथक कार्यरत असेल. आक्षेपार्ह गोष्टींवर कारवाई केली जाणार.